स्वातंत्र्यदिनानंतर करणार जाहीर : युती नाही, स्वबळावर लढणार : दीपक
प्रतिनिधी / पणजी
महाराष्ट्रवादी गोंमतक पक्षाने (मगोप) आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून 18 उमेदवार निश्चित केल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली. सध्या तरी कोणाकडे युती न करता मगो पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले. येत्या 15 ऑगस्टनंतर उमेदवार व त्यांचे मतदासंघ जाहीर करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काल गुरुवारी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांना निवेदन सादर करुन आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मगो पक्ष तरुणांकडे देण्याची तयारी
त्यांनी सांगितले की मगो पक्ष आता युवावर्गाकडे देण्याची तयारी करण्यात येत असून उमेदवारही तरुणच निश्चित करण्यात येत आहेत. मगो पक्षाची कार्यकारी समिती, केंद्रीय समितीकडे विचारविनियम केल्यानंतर उमेदवार व मतदारसंघाची नावे त्या दोन्ही समित्यांची मान्यता घेऊन जाहीर केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पक्ष कोणत्याही इतर पक्षाकडे युती करणार नाही तर ‘एकला चलो रे’ अशी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
काब्रालनी वाऱयावर घालण्याची गरज नव्हती
दरम्यान त्याच मगो पक्षाचे आमदार माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र युतीचे संकेत दिले असून ती कोणाकडे करावी याबाबत काहीच ठरले नसल्याचे सांगितले. ‘आप’ सोबत वीजमंत्र्यांची जी आव्हाने प्रति आव्हाने सुरु आहेत ती हास्यास्पद असून वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी ती गोष्ट वाऱयावर घालवण्याची गरज नव्हती. त्यासाठी वादविवाद करण्याची आवश्यकता नाही. दुसरा पक्ष सागतो, आव्हान देतो म्हणून तसे करायला पाहिजे, असे नाही अशी प्रतिक्रिया ढवळीकर यांनी प्रकट केली.
ऑनलाईन शिक्षण-नेटवर्कबाबत राज्यपालांना निवेदन
गोव्यात ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेटचे जाळे पुरेसे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाला मुकतात आणि त्यांना ते मिळन नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसतो, अशी तक्रार मगो पक्षातर्फे राज्यपालांकडे करण्यात येऊन तसे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. राज्यपालांनी त्या लक्ष घालण्याचे आश्वासन देऊन हा विषय विद्यार्थीवर्गासाठी महत्त्वाचा असल्याने नमूद करुन त्यात लक्ष घालतो, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करुन त्या आशयाचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे. पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सदर माहिती दिली.









