अद्याप कुठल्याही पक्षाकडे युती नाही, भाजपशी तर युती नकोच नको
प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आपले 12 उमेदवार निश्चित केले असून सध्या तरी कोणत्याही पक्षाकडे युती करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र भाजपकडे कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.
पक्षाच्या केंद्रीय समितीची महत्त्वाची बैठक दि. 10 ऑगस्ट रोजी पक्षाच्या पणजीतील कार्यालयात झाली. बैठकीत संपूर्ण राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
भाजपशी युती नाहीच
कोणत्याही परिस्थितीत भाजपशी आघाडी करायची नाही. आज या पक्षाबरोबर चर्चा झाली याचा अर्थ त्यांच्याबरोबर युती करण्याचा निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. पक्ष 23 मतदारसंघांची तयारी करीत आहे. परवाच्या बैठकीत एकूण 12 मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती दीपक ढवळीकर यांनी दिली. आगामी निवडणुकीत मगो पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा पुनरुच्चार दीपक ढवळीकर यांनी केला.
मगोचे निश्चित झालेले 12 उमेदवार
फोंडा – केतन भाटीकर
शिरोडा – संकेत मुळे
सावर्डे – बालाजी गावस
कुडचडे – आनंद प्रभुदेसाई
मये – प्रेमानंद शेट (अनंत शेट यांचे बंधू)
पेडणे – प्रविण आर्लेकर
मांद्रे – जीत आरोलकर
हळदोणा – महेश साटेलकर
प्रियोळ – दीपक ढवळीकर
मडकई – सुदिन ढवळीकर
डिचोली – नरेश सावळ
कुंभारजुवे – पांडुरंग मडकईकर यांच्या कुटुंबियांपैकी एखादी व्यक्ती.
सांखळीत सर्वपक्षीय उमेदवार
मगो पक्ष 11 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे. त्यांची नावे सप्टेंबरच्या अखेरीस निश्चित होतील. तथापि, सांखळी या मतदारसंघात मगो आपला उमेदवार उभा करणार नाही, कारण या मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकच उमेदवार राहील. मांद्रेमध्ये 2017 च्या निवडणुकीत पक्षाने जी भूमिका बजावली होती तिच भूमिका या निवडणुकीत सांखळीत राबविली जाणार आहे, असे दीपक ढवळीकर म्हणाले. अलिकडेच काँग्रेस, राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्ड व मगो पक्ष यांची एक बैठक झाली त्यात सांखळीच्या बाबतीत एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दीपक ढवळीकर म्हणाले.
पक्षाच्या निर्णयावर टीका नको
दि. 10 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पक्षाने जे उमेदवार निश्चित केलेले आहेत त्यापैकी कोणावरही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी टीका टिपणी करता कामा नये. कारण हा निर्णय पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचा आहे. कुंभारजुवेबाबत निर्णय पुढील महिन्यात होईल. इतर उमेदवार निश्चित आहेत. या उमेदवारांबाबत कोणीही उलटसुलट भाष्य केले तर पक्ष खपवून घेणार नाही, असे कार्यकर्त्यांना कळविले आहे.









