प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात पुन्हा कलह सुरू झाला असून पक्षाच्या 27 सदस्यांनी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. मगो पक्षाचे उपाध्यक्ष रत्नाकांत म्हार्दोळकर यांनी ही माहिती दिली असून त्यांना अविश्वास ठरावाची प्रत प्राप्त झाली आहे. हा ठराव मगोपच्या केंद्रीय समितीसमोर लवकरच चर्चेसाठी आणि निर्णयासाठी येणार असून त्यावेळी त्यावर योग्य तो निकाल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पक्षाची आमसभा घेण्यात आली नाही. तसेच पक्षीय संघटनात्मक निवडणुकाही झाल्या नाहीत. अशी कारणे अविश्वास ठरावातून देण्यात आली असून पक्षाचे अध्यक्षपदही अडवून बसल्याचा आरोप दीपक ढवळीकर यांच्यावर ठरावातून करण्यात आला आहे. येत्या 8 ते 10 दिवसात मगोपच्या केंद्रीय समितीची खास बैठक आयोजित करून त्यावर विचार होईल आणि योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
ठरावातून अध्यक्षांवर आरोप
आमसभा तसेच पक्षाच्या निवडणुका न घेता दीपक ढवळीकर यांनी अध्यक्षपद अडवून ठेवले, असे ठरावात म्हटले आहे. 2019 मध्ये ढवळीकर यांनी पक्षीय निवडणुका घेतल्या नाहीत. 2017 मध्ये काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही त्यांनी काहीच कारवाई केली नाही. अध्यक्षपद बेकायदेशीरपणे आपल्या हातात ठेवले. गेली 6 वर्षे पक्षाची आमसभा घेतली नाही. 2017 मध्ये फक्त मुदतवाढ घेण्यासाठी नावापुरती आमसभा घेतली, परंतु नंतर ती झालीच नाही. दोन वर्षाची मुदतवाढ 2019 मध्ये संपली. तरीही त्यांनी काहीच केले नाही. लवू मामलेदार यांना मात्र बेकायदेशीरपणे पक्षातून काढून टाकले, असे विविध आरोप या ठरावातून करण्यात आले आहेत.
गेली काही वर्षे मगो पदाधिकारी व प्रमुख सदस्यांमध्ये याच प्रश्नावरून असंतोष खदखदत होता आणि काहीजण उघडपणे ढवळीकर यांच्या विरोधात बोलत होते. त्याचाच उद्रेक अविश्वास ठरावातून झाल्याचे समोर आले आहे.
पक्षाच्या घटनेत अविश्वासाची तरतूद नाही : दीपक ढवळीकर
अविश्वास ठरावावरुन मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पलटवार केला असून तो ठराव आणणारे 27 जण कोण? अशी विचारणा केली आहे. तसेच पक्षाच्या घटनेत अशा प्रकारे अविश्वास आणण्याची तरतूद नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला आहे. कोरोना संकटामुळे आमसभा तसेच पक्षीय निवडणुका घेणे शक्य झाले नाही असे कारण त्यांनी दिले आहे. सदर ठराव करणाऱयांनी त्यांची ओळख दाखवावी, असे आव्हान ढवळीकर यांनी दिले आहे.









