निधीच्या कमतरतेमुळे देखभाल ठरली अवघड
कॅम्ब्रिजमधील हिंदूंसाठी एकमात्र पूजेचे ठिकाण
इंग्लंडमध्ये इटालियन वंशाचा एक व्यक्ती भारत भवन मंदिराला वाचविण्यासाठी लढत आहे. कॅम्ब्रिजमध्ये राहणाऱया 5 हजार हिंदूंसाठी हे एकमात्र पूजेचे स्थळ आहे. मंदिरासाठी लढणाऱया पिएरो डी एंगेलिका नावाच्या व्यक्तीचे तेथे एक सलून आहे. निधीच्या कमतरतेमुळे देखभाल होत नसल्याने ही वास्तू पाडविली जाणार आहे.

मागील आठवडय़ात पिएरो एका ठिकाणी जात असताना एक जुने वाचनालय पाडविले जात असल्याचे त्यांना दिसून आले. पण यातच भारत भवन मंदिरही असल्याने त्यांना धक्काच बसला. या मंदिराच्या उभारणीत राजस्थानमधील गुलाबी रंगाच्या बलुआ दगडाने तयार केलेले नक्षीदार स्तंभ वापरण्यात आले होते. हे पाहून त्यांना पिएरो यांना स्वतःच्या आजोबांची आठवण आहे, कारण पिएरो यांचे आजोबा चर्चसाठी वापरल्या जाणाऱया दगडांवर अशाचप्रकारचे नक्षीकाम करायचे आणि पिएरो त्यांना मदत करत होते.
मंदिर पाडविण्याचे मूळ कारण निधीची कमतरता असल्याचे पिएरो यांना समजले. 29 मार्च रोजी ते पाडविण्यात येणार होते, पण पिएरो यांच्या प्रयत्नांमुळे हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. निधी जमविण्यासाठी पिएरो यांनी गोफंडमी पेज तयार केले, पण 3250 पाउंडपैकी (सुमारे 3 लाख 32 हजार रुपये) त्यांना आतापर्यंत 570 पाउंडच प्राप्त झाले आहेत. भारत भवनला स्थानिक परिषदेने 20 वर्षांपूर्वी जागा दिली होती, या मंदिराच्या उभारणीकरता भारतातून सामग्री पाठविण्यात आली होती.









