राजापूर-भालावलीतील प्रकाराने खळबळ : चांदीच्या मुखवटय़ांसह दागिन्यांचा पेटाराच लांबवला
वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील भालावली येथील श्री लक्ष्मी माधव मंदिराच्या गाभाऱयाचे कुलूप तोडून देवांच्या चांदीच्या मुखवटय़ांसह दागिने असलेला पेटारा व दानपेटीही फोडून त्यातील सर्व रक्कमही लांबवण्याची घटना घडली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. यामध्ये सुमारे 1 लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, भालावली येथील श्री लक्ष्मी माधव मंदिराचे पुजारी रमाकांत पाध्ये हे नित्यपूजेसाठी बुधवारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना मंदिराचा गाभारा उघडा दिसला. त्यांनी पाहणी केली असता गाभाऱयातील देवांचे मुखवटे, दागिने असलेला पेटारा जागेवर नसल्याचे लक्षात आले. या बाबतची माहिती त्यांनी तत्काळ ग्रामस्थ व पोलिसांना दिली.
दरम्यान चोरटय़ांनी रात्री ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त हेत आहे. या चोरीत अज्ञात चोरटय़ांनी देवांचे 3 चांदीचे मुखवटे व देवांच्या गळय़ातील सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीच्या साखळय़ा चोरून नेल्या आहेत. चोरटय़ांनी गाभाऱयाबाहेर असलेली दानपेटी फोडून त्यातील सर्व रक्कमही लांबवली आहे. यामध्ये सुमारे 1 लाखाचा किंमती ऐवज चोरटय़ांनी लांबवला आहे. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नाटे पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर श्वानपथकासह ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत ते मंदिरात पोहोचले नव्हते.
अज्ञात चोरटय़ांनी चोरलेला लॉकर देवळापासून थोडय़ा अंतरावर जंगलात आढळून आला. त्यातील चांदीच्या मूर्ती व दागिने मात्र गायब होते. दरम्यान काही वर्षांपूर्वी धोपेश्वर मंदिरात देखील अशीच चोरी झाली होती. त्यामध्ये देवस्थानचा किंमती ऐवज चोरीला गेला होता. त्यानंतर मंदिरात एवढी मोठी चोरी होण्याची तालुक्यातील ही दुसरी घटना असून त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
देवळातच ठेवलेल्या किल्लीचा वापर?
भालावली-कोतापूर रस्त्यावर पिशेदवाडी येथे श्री लक्ष्मी माधव मंदिर आहे. मंदिरापासून वस्ती खूप दूर असून कुलपाची किल्ली तेथीलच एका खुंटीला लावलेली असते. तपासात ती चावी नेहमीच्या जागेवर नसल्याचे लक्षात आले. शिवाय कुलूपही गायब होते. त्यामुळे त्या चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून चोरटय़ाने मंदिरात प्रवेश करून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.









