प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी मिथून विष्णू पवार (25) मूळ महाराष्ट्र सध्या नईबाग-पोरस्कडे या संशयिताला 18 रोजी अटक केली.
विर्नोडा येथील श्री रवळनाथ मंदिरात चोरी झाल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी पेडणे पोलिसांकडे दिली होती. यानुसार पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. श्वानपथक आणि ठसे तज्ञांना मंदिरात आणून ठसे घेतले होते. मंदिराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या फंड पेटीतील 3000 हजार रुपये लांबविले.
चोरटय़ांनी आपल्या तोंडावर बुरखा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केली. चोरटय़ाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार केले. यासाठी ग्रामस्थांची मदतही घेण्यात आली. या प्रकरणी मिथुन विष्णू पवार नईबाग पोरस्कडे येथे राहत असलेल्या या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, पोलिस कॉन्स्टेबल रितेश नारुलकर, कालिदास राऊत आदींनी ही करवाई केली.









