बावी येथे सापडले नवजात अर्भक : माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील बावी (ता. माढा) येथील रस्त्यालगत असणाऱया सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात व्यक्तींनी पुरुष जातीचे नवजात अर्भक मंदिराच्या पायऱयांसमोर सोडून पलायन केल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शी सुदर्शन माळी यांनी दिलेल्या माहितीवरून, माळी हे शेतातील रस्त्याने मंदिरात दर्शनासाठी निघाले असता, पंढरपूरकडून येणारी पांढऱया रंगाची बोलेरो गाडी सिद्धेश्वर मंदिरासमोर येऊन उभा राहिली. त्यामधून चार ते पाच पुरुष व एक महिला लहान बाळासह खाली उतरले. महिलेने तिच्या हातातील नवजात अर्भक मंदिराच्या पायरीसमोर ठेवले. त्यासोबत एक दुधाची बाटली, वाटी व कापसाचा बोळा एका पिशवीत ठेवून घाईगडबडीत गाडीत बसून कुर्डुवाडीच्या दिशेने निघून गेले. माळी मंदिरापर्यंत जाईपर्यंत ती गाडी लांब गेली होती.
या घटनेची माहिती माढा पोलिसांना मिळताच माढा पोलिसांनी आशा वर्कर्सच्या मदतीने ते बाळ ताब्यात घेऊन प्रथम उपळाई प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासून त्याच्या तब्येतीची खात्री केली. बाळ व्यवस्थित असल्याने त्याला सोलापूर सिव्हील हॉस्पिटला पाठविले. राज्य बाल संरक्षण संस्थेसमोर ठेवले जाईल. त्यानंतर बाल संगोपनासाठी शिशू विहाराकडे दाखल केले जाणार असून, बाळाचा सांभाळ व पालन-पोषण करावयाचा नाही या हेतून परित्याग केला म्हणून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे माढÎाचे सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी सांगितले.









