मारहाणीत चौघेजण जखमी, तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढविला

प्रतिनिधी /बेळगाव
मंदिराच्या जागेच्या वादावरून रणकुंडये (ता. बेळगाव) येथे बुधवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली आहे. हाणामारीत चौघेजण जखमी झाले असून या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. सायंकाळी 7.30 ते रात्री 8 यावेळेत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पाशासाब मेहमुदपाशा इनामदार (वय 74), सय्यद मेहमूर पाशासाब इनामदार (वय 32), उमेद इक्बाल अहमद सौदागर (वय 33 तिघेही राहणार वीरभद्रनगर) व अंजुम बाबाजान इनामदार (वय 42 रा. आझाद गल्ली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रणकुंडये येथे जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमींच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ आदी अधिकारी तळ ठोकून होते. तणावाच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलबाहेरही अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणकुंडये येथे एक लहान मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. बेळगावहून आलेल्या काही जणांनी या कामाला आक्षेप घेत विटांना धक्का पोहोचविला. त्यामुळे संतप्त गावकऱयांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.









