लखीमपूर हिंसा प्रकरण – एफएसएलच्या बॅलेस्टिक अहवालातून उघड
वृत्तसंस्था/ लखनौ
लखीमपूर हिंसा प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. एफएसएलकडून प्राप्त बॅलेस्टिक अहवालात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष यांच्या रिव्हॉल्हर आणि रायफलमधून गोळीबार झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी आशीष आणि त्याचा मित्र अंकित यांच्याकडून 4 बंदुका जप्त केल्या होत्या. यात अंकित दासची पिस्तुल, लतीफची रिपीटर गन आणि आशीष मिश्राची रायफल सामील होती.
पोलिसांकडून या चारही शस्त्रास्त्रांची चाचणी करण्यात आली. चाचणीच्या अहवालात या चारही शस्त्रास्त्रांमधून गोळीबार झाल्याची पुष्टी मिळाली आहे. या अहवालामुळे तुरुंगात कैद तिन्ही आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. तर अंकित दास आणि लतीफ यांनी एसआयटीसमोर यापूर्वीच गोळीबाराची बाब मान्य केली होती.
पोलिसांनी हिंसेनंतर प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमये पाठविले होते, त्याचा अहवालही एसआयटीला मिळाला आहे. फुटेजमध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार करण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
लखीमपूर हिंसाप्रकरणी घटनास्थळावरून प्राप्त रक्ताच्या नमुन्यांचे अहवालही आले आहेत. सीरोलॉजी अहवालात घटनास्थळी पडलेले रक्त मानवी शरीराचे असल्याचे नमूद आहे. आता लोकांच्या मोबाईल फोनमधून प्राप्त चित्रफितींचा अहवाल प्राप्त होणे शिल्लक आहे. 12 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
3 ऑक्टोबर रोजी शेतकऱयांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना विरोध करत काळे झेंडे दाखविले होते. यादरम्यान एका वाहनाने शेतकऱयांना चिरडले होते. यात 4 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याने हिंसा भडकली होती. हिंसेदरम्यान शेतकऱयांनी एका चालकासह 4 जणांचा जीव घेतला होता. यात पत्रकाराचाही समावेश होता.









