ऑनलाईन टीम / जयपूर :
देशात एकीकडे कोरोना व्हायरसचे संकट आणि भीती वाढत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते आपल्या बेताल बोलण्याने नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. या यादीत आता राजस्थानचे जल आणि ऊर्जा मंत्री बिडी कल्ला याचे नाव समोर आले आहे.
बिडी कल्ला यांनी देखील कोरोना लसीकरणाबाबत बेताल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आपल्याला माहिती आहे का ? लस कोणाला दिली जाते? आजपर्यंत आपल्या देशात केवळ मुलांनाच लस दिली जात आहे. वृद्धांना लस कुठे दिली लागते? कोरोनातही सर्वात पहिली मुलांनाच लस दिली पाहिजे कारण मुले सुरक्षित असणे आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले, मोदी सरकारने वृद्धांना लस द्यायला सुरुवात केली आहे. मी स्वतः वृद्धांना बोलताना ऐकले आहे की, आम्ही तर तसेही 80-85 वर्षांचे झाले आहोत. आमचा मृत्यू कोरोनाने झाला तरी काही हरकत नाही. मात्र, मुले सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्यांदा मुलांना लस दिली पाहिजे.
एवढ्यावरच न थांबता कल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण चुकीचे आहे. लस आली तर ती सर्वप्रथम मुलांना द्यायला पाहिजे होती. मात्र मोदी सरकारने असे केले नाही आणि त्यामुळेच समस्या वाढली आहे .
- केंद्रीय मंत्र्याचा पलटवार :
केंद्रीय जल संसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानचे मंत्री बिडी कल्ला यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, लसी संदर्भातील काँगेस नेत्याचे हे हास्यास्पद ज्ञान आणि विधान आहे. काँग्रेस आता व्हॅक्सीन राजकारणावरून क्लाउन राजकारणावर आली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.