प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरपुढे असणाऱया विविध समस्या, प्रश्न सोडविण्याची मागणी विविध पक्ष, संस्था आणि संघटनांच्या वतीने सोमवारी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. पंचगंगा प्रदूषणासह खंडपीठ, रखडलेले शाहू स्मारक, कृषी पर्यटन, स्क्रॅपच्या रिक्षा, चीनी बनावटीची फुले आदी प्रश्नांसंदर्भात मंत्री ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले. मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱयावर होते. सोमवारी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय बैठकाही घेतल्या. त्याचबरोबर निवेदनेही स्वीकारली.
पंचगंगा नदी प्रदूषणास आळा घाला ः स्वाभिमानी शेतकरी संघटना
प्रा. जालंदर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी केली. प्रदूषणामुळे नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहे. रासायिक सांडपाण्यामुळे नदी काठच्या लाखो नागरिकांचे जीवन उद्धवस्त होण्याच्या वाटेवर ओह. केमिकलयुक्त पाणी पिण्याची वेळ आल्याने हजारोजण कॅन्सरच्या विळख्यात सापडले आहे. शेतीलाही धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नाममात्र कारवाई करून केमिकलयुक्त पाणी नदीत सोडणाऱया उद्योगांना अभय देत आहे. गेली वीस वर्षे प्रदूषणाविरोधाचा लढा सुरू आहे, प्रदूषण रोखावे, असे स्वाभिमानीने निवेदनात म्हटले आहे. यावेळी जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर शंभूशेटे, अजित पोवार, विक्रम पाटील, सागर कोंडेकर, कलगोंडा पाटील, रमेश भोजकर, बाहुबली चौगुले, अशोक टारे, रायगोंडा पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
शाहू स्मारक पूर्ण करा, कृषी पर्यटनाला चालना द्या ः मनसे
शाहू मिलच्या जागेत 450 कोटींच्या शाहू स्मारक उभारण्यासंदर्भातील आराखडा मंजूर असूनही अद्याप स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. ते तातडीने सुरू करून स्मारक पूर्ण करावे, कोल्हापूरच्या नद्या कृषी पर्यटनाची पेंदे म्हणून विकसित होऊ शकतात. त्यामुळे कृषी पर्यटनाला चालना द्यावी, जंगल, वन पर्यटनाला दाजीपूर, राधानगरी अभयारण्यामुळे मोठी संधी आहे. त्यामुळे कृषी व वन पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष्गा विजय करजगार, संघटक रत्नदीप चोपडे, ऍड. आनंदराव चव्हाण, राजन हल्लोळी, सुनील तुपे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन केली.
बदली वाहन घेताना सबसिडी द्या ः ऍटोरिक्षा संघर्ष समिती
जुन्या ऍटोरिक्षाची वयोमर्यादा पूर्ण झाल्यावर नवीन अथवा बदली वाहन खरेदी करताना रिक्षाचालक अथवा मालकांना बँकेतून कर्ज घेतो. त्याला सबसिडी मिळावी, नव्याने बाजारात येत असलेल्या ई-रिक्षा पर्यावरणाच्या दृष्टीने जरी महत्वाच्या असल्या तरी लोकसंख्येच्या प्रमाणात ई-रिक्षाची संख्या अतिरिक्त होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा रिक्षा व्यवसायाचे प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे ई-रिक्षांना परवाने बंधनकारक करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ऍटोरिक्षा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱयांनी निवेदनाव्दारे मंत्री ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी सचिव सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, अरूण घोरपडे, विश्वास नांगरे, शिवाजी पाटील, मधुसुदन सावंत, शर्पुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
अंबाबाई मंदिराचे सर्व दरवाजे खुले करा, दर्शन वेळ पूर्ववत करा ः व्यापाऱयांची मागणी
अंबाबाईचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असले तरी तेंव्हापासून पूर्व दरवाजाच खुला ठेवण्यात आला आहे. अन्य दरवाजे बंद आहे. महाव्दार व घाटी दरवाज्यासह सर्व दरवाजे खुले करण्यात यावेत, तसेच मंदिरात देवीच्या दर्शनाची वेळ पहाटे 5 ते रात्री 10ë30 पर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी अंबाबाई मंदिर परिसरातील व्यापाऱयांनी एका निवेदनाव्दारे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी ठाकरे यांना अंबाबाईची प्रतिमा भेट देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वप्निल खांडके, अजित मेवेकरी, अमित काटवे, अभिजित होस्पेटकर, सर्जेराव निंबाळकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
शासकीय निधी प्रदूषण रोखण्यासाठी वापरा ः प्रजासत्ताक संस्था
प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना रंकाळा व पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाबरोबर ई-मेलव्दारे केलेल्या पाठपुराव्याविषयीही आवगत केले. प्रदूषण नियंत्रणचे अधिकारी निष्क्रिय आहेत, चिपळूणच्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ नसलयाने प्रदूषणाचे नमुने सिद्ध होत नाहीत, पाणी प्रदूषित होत असल्याने जलचरांसह मानवी जीवनालाही धोका निर्माण झाला आहे. जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे नदी आणि तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासकीय निधीचा प्राधान्याने वापर करावा, असे देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे.
प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घाला
चिनी बनावटीच्या प्लास्टिकच्या फुलांची विक्री बाजार पेठेत सुरू आहे. त्याचा फटका शेतकऱयांच्या फुलांच्या विक्रीवर झाला आहे. शेतकऱयांचे नुकसान होत आहे. फुलांचे दर कोसळत आहे. फुल शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांवर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
मराठा समाजातील असंतोषाकडे शौर्यपीठाने वेधले लक्ष
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर महत्वाच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा शौर्यपीठच्या पदाधिकाऱयांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने मराठा समाजात पसरलेल्या असंतोषाकडे पदाधिकाऱयांनी मंत्री ठाकरे यांनी लक्ष वेधले. लवकरच या प्रश्नी मराठा समाजाच्या सुकाणू समितीबरोबर व्यापक बैठक घेतली जाईल, असे आवश्वासन मंत्री ठाकरे यांनी दिले. यावेळी प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक, चंद्रकांत चिले, शिवाजीराव लोंढे यांच्यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
खंडपीठप्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांशी भेट
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी अध्यक्ष ऍड. गिरीश खडके यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या मागणीसंदर्भात निवेदन सादर केले. या प्रश्नी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खंडपीठ कृती समितीची भेट घडवून आणली जाईल, अशी ग्वाही मंत्री ठाकरे यांनी दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, सचिव ऍड. विजयकुमार ताटे-देशमुख, सहसचिव संदीप चौगुले, लोकल ऑडिटर ऍड. संकेत सावर्डेकर, ऍड. करणकुमार पाटील, ऍड. सम्राट शेळके, ऍड. विशाल फराकटे आदी उपस्थित होते.








