शिरवडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा विषय
प्रतिनिधी/ मडगाव
शिरवडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधून साळ नदीत दूषित पाणी सोडण्यावरून आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस आणि पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांच्यात शनिवारी चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. आपत्कालीनप्रसंगी सांडपाणी सोडण्याच्य प्रक्रियेचे पालन करण्यात आलेल्या अपयशास काब्राल हे जबाबदार असल्याचा दावा आमदार व्हिएगस यांनी केला. यावेळी आमदार व्हिएगस व मंत्री काब्राल यांच्यात अगदी हातवारे करून ‘तू तू-मै मै’ झाली. काब्राल यांनी यापुढे असे दूषित सांडपाणी नदीत सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट करताना ज्या अधिकाऱयांनी सूचनांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
शुक्रवारी बाणावलीचे आमदार व्हिएगस यांनी सदर एसटीपी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली होती आणि सोडले जाणारे दूषित पाणी साळ नदीत जात असल्याचे उघडकीस आणून दिले होते. तसेच मंत्री काब्राल यांच्यावर आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी मंत्री काब्राल यांनी शिरवडे एसटीपी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी आमदार व्हिएगस यांना बोलविण्यात आले होते.
यावेळी या विषयावर चर्चा करताना व्हिएगस यांनी तावातावाने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तसेच दोषारोप झाले. मंत्र्यांनी कोणाला तरी शिव्या दिल्याचा आरोप आमदार व्हिएगस यांनी केला. यावेळी उगाच कोणत्याही प्रकारचे आरोप करू नका अशी तंबी मंत्री काब्राल यांनी व्हिएगस यांना दिली. दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी सुरू झाल्याने उपस्थित अधिकारी व पत्रकार अवाक झाले.
एक थेंबही सांडपाणी सोडले जाणार नाही
व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. वॉल्व खोलून सांडपाणी सोडण्याची गरज नव्हती. असे वॉल्व सर्वच एसटीपी प्रकल्पांना असतात. अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीच्या वेळी ते खोलायचे असतात. मात्र येथे ते खोलण्याची कोणतीही गरज नव्हती. त्यामुळे संबंधित ऑपरेटर व अभियंत्यावर आवश्यक कारवाई केली जाईल. सध्याच्या घडीला वॉल्वमधून एक थेंबही सांडपाणी सोडले जाणार नाही याची ग्वाही आपण जनतेला देतो. ज्या त्रुटी आहेत त्या दोन-तीन दिवसांत जाग्यावर घालण्यात येणार आहेत, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.
व्हिएगस यांचे वर्तन सभ्यतेला धरून नाही
आपण मंत्री आणि अध्यक्ष आहे व त्यामुळे आपली जबाबदारी आपण मान्य करतो. परंतु प्रत्येक ठिकाणी आपण कसे लक्ष ठेवणार. त्यासाठी नियुक्त अधिकारी आहेत. त्यांनी या प्रकाराबद्दल मला माहिती दिली नाही. त्यांच्यावर काय कारवाई करायची ती मी करणार. मात्र आमदार व्हिएगस यांनी मला शुक्रवारी बोलाविले असते, तर मी आलो असतो. शुक्रवारी मी मोपा येथे गेलो होता. मात्र व्हिएगस यांची शुक्रवारची भाषा आणि शनिवारी जे ते ज्या प्रकारे बोलले ते सभ्यतेला शोभत नसल्याची टीका मंत्री काब्राल यांनी केली. मला मंत्रिपदावरून काढून टाकण्यासाठी व्हिएगस यांनी सांगण्याची गरज नाही. भविष्यात कधी ते मंत्री बनल्यास त्यांना सर्व काही कळून चुकेल व मी त्यांना त्यावेळी आठवण करून देईन, असे उत्तर काब्राल यांनी एका प्रश्नावर दिले.









