कोकणपट्टीला जोरदार हादरा ः शिवसेनेची गळती थांबेना
प्रतिनिधी/ मुंबई, गुवाहाटी
शिवसेनेचे कोकणातील हेवीवेट नेते आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही अखेर शिवसेनेची साथ सोडली आहे. रविवारी सकाळपासून ते नॉटरिचेबल झाले आणि अखेर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते गुवाहाटी येथे पोहोचल्याचे आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याचे वृत्त आणि गळाभेटीचे फोटो प्रसिद्ध झाल्याने रविवारचा दिवसही शिवसेनेसाठी गळतीचा ठरला. एका बाजूला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करत असताना शिवसेनेला लागलेली गळती थांबत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. हे सर्व घडत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर तोफगोळे डागले असून ‘आसामच्या कामाख्या देवीला 40 रेडे पाठवले आहेत, आता त्यांची मृत शरीरेच महाराष्ट्रात येतील’ असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर नेत्यांना पाठवलेल्या नोटिसीला उद्या सोमवारी सायंकाळी 5.30 पर्यंत उत्तर द्यायची मुदत आहे. तत्पूर्वीच थेट गुवाहाटीमधून बंडखोर नेते एकनाथ शिंदे, त्यांचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
याशिवाय अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी कायदेशीरदृष्टय़ा आवश्यक असणाऱया गट विलीन करण्याच्या पर्यायाचीही तपासणी शिंदे गटाकडून केली जात आहे. यामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार या संघटनेसह शिवसेनेतूनच फुटून स्थापन झालेल्या मनसेच्या पर्यायाचाही विचार केला जात आहे. तशा प्रकारची चाचपणी सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.
रविवारी सकाळपासून नॉटरिचेबल
शनिवारपर्यंत शिवसेनेतील बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी आयोजित होत असलेल्या बैठकांमध्ये सहभागी होणारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री रविवारी सकाळी अचानक ‘नॉटरिचेबल’ झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात शंकेची पाल चुकचुकली तर शिवसेनेच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. माध्यमांवरुनही चर्चेला उधाण आले. ते बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या छावणीत जाणार इथपासून ते उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पाठवले आहे, अशा चर्चा सुरु झाल्या. सकाळी ते आधी सुरतला गेले आणि तेथूनच पुढे गुवाहाटीला गेल्याचे अखेर सायंकाळच्या सुमारास स्पष्ट झाले. त्याआधीही आता उदय सामंतही शिंदेंच्या छावणीत जाणार हाच मतप्रवाह होता. तेच आता शिंदेंच्या छावणीत दाखल झाल्याने शिवसेनेचा आणखी एक मंत्री फुटला आहे.
काय सुरु होते कोकणात
गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे, रामदास कदम, भास्कर जाधव आणि राजन साळवी या कोकणातील नेत्यांचा एक गट तयार झाल्याची चर्चा होती. हा गट अनिल परब, सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होता. अनिल परब आणि तटकरे नेहमीच आमच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात, असा या नाराजांचा आरोप होता. त्यामुळे कोकणातील शिवसेना आमदारांमध्ये नाराजी होती. मात्र त्याची केवळ चर्चा आणि कुरबुरी सुरु होत्या. याआधीच दीपक केसरकर या कोकणातील मोठय़ा नेत्याने शिवसेनेविरोधात बंडखोरांना साथ दिली आहे, त्याला आता उदय सामंत यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे कोकणपट्टय़ात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दोन दिवस पालीमध्ये निवास
शिंदेंच्या छावणीत दाखल होण्यापूर्वी सामंत शुक्रवारी सकाळी ते पाली निवासस्थानी आले होत़े याठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अनेक शिवसैनिकांची भेटही घेतली. बैठका केल्य़ा विशेष म्हणजे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी आपल्याबाबत अफवा पसरवण्यात येत आहेत़, असेदेखील सांगितले. आपण शिवसेनेसोबतच राहणार आहे, असे स्पष्ट केले. तथापि शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांचा विचार शिवसेनेच्या नेतृत्वाने करण्याची गरज असल्याचे मात्र सामंत यांनी बोलून दाखवले होत़े त्यांच्या या वक्तव्याचा खुलासा मात्र रविवारी सायंकाळी ते मुंबईहून सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचल्यावरच झाला.
फक्त आदित्य ठाकरे उरले
शिवसेनेचे एक एक आमदार बंडखोरांच्या गळाला लागत असताना आता आदित्य ठाकरे यांचे विश्वासू व निकटवर्तीय असलेले उदय सामंतही बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आदित्य ठाकरे मंत्री म्हणून उरले आहेत. विशेष म्हणजे अगदी शनिवारपर्यंत सामंत घसा ताणून उद्धव ठाकरे यांचे गुणगान गात होते, तसेच शिंदे गटामध्ये सामील झालेल्या आमदारांना परत येण्याविषयी आवाहन करत होते. परंतु तेही शिंदेंच्या गटात गेल्याने नक्की काय झाले असावे, याविषयी तर्क लढवले जात आहेत.
उदय सामंत यांचा राजकीय प्रवास…
उदय सामंत हे 2004 साली राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होत़े तर सलग दुसऱयांदा ते 2009 साली पुन्हा राष्ट्रवादीकडून आमदार झाल़े तर 2012 ते काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले होत़े तर 2014 साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल़ा तर शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होत़े तसेच 2019 मध्ये पुन्हा ते शिवसेनेच्या तिकिटावर पुन्हा निवडून आले होत़े यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीत सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पद देण्यात आले हेत़े याशिवाय सिंधूदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.









