ग्रामविकास खात्यामध्ये अकारण हस्तक्षेप करीत असल्याचा ठपका
प्रतिनिधी / बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यामध्ये पुन्हा मतभेदाची दरी निर्माण झाली आहे. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यपाल वजुभाई वाला व राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग यांच्याकडे तक्रार केली आहे. आपल्या खात्यामध्ये अकारण हस्तक्षेप करीत असल्याचा ठपका त्यांनी येडियुराप्पा यांच्यावर ठेवला आहे.
येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच एका प्रभावी मंत्र्याने त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. मागील दीड वर्षापासून आपण ग्रामविकास खात्याची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, आपल्या निदर्शनास आणून न देता येडियुराप्पाच अनेक प्रमुख निर्णय घेत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेता आणि मंत्री म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनामुळे दुःख झाले आहे, असे ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामविकास खात्याकडून मंजूर झालेला 1200 कोटी रुपयांच्या अनुदानाशी संबंधित अनपेक्षितपणे येडियुराप्पांकडून हस्तक्षेप होत आहे. आरडीपीआर खात्याचे अनुदानही त्यांनी थेट वाटप केले आहे. अर्थसंकल्पात ग्रामविकास खात्याला अनुदान देण्याबाबत आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, अशी लेखी तक्रार ईश्वरप्पा यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन केली आहे. त्याचप्रमाणे राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग यांच्याकडेही तक्रार दाखल करून त्यांनी हायकमांडचे लक्ष वेधून घेतले आहे.









