मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंत्रिमंडळ विस्तारासाठी हायकमांडच्या सूचनेची प्रतीक्षा करीत आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी वरिष्ठांनी पुन्हा बोलविल्यास दिल्लीला जाऊन येईन. सोमवारपर्यंत हायकमांडचा संदेश येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल?, कोणाकोणाला मंत्रिपदे मिळतील?, याविषयीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे.
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शुक्रवारी सकाळी बसवराज बोम्माई हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रल्हाद जोशी, राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच राज्यातील मंत्री आणि खासदारांची भेट घेतली होती. तर शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. दरम्यान नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराविषयी हायकमांडची सूचना सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते.
तर बेंगळूरला परतल्यानंतर त्यांनी सोमवारपर्यंत हायकमांडचा निर्णय समजू शकतो. आपण मंत्र्यांची संभाव्य यादी हायकमांडला दिलेली नाही. मंत्रिपदे देण्याबाबत हायकमांडच निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोणीही लॉबिंग करण्याचा प्रश्नच नाही. जर पुन्हा वरिष्ठांनी पुन्हा बोलावून घेतले तर दिल्लीला जाऊन चर्चा करेन, असे ते म्हणाले.
दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळ यादीला अंतिम स्वरुप
येत्या दोन-तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळ यादीला अंतिम स्वरुप मिळेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. बेंगळूर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी केंद्रातील नेत्यांशी चर्चा केली आहे. दोन दिवसांत श्रेष्ठींचा संदेश येईल. शक्य झाल्यास पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे ते म्हणाले.









