प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्य भाजपमधून दबाव वाढल्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा बुधवारी किंवा गुरुवारी हायकमांडची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. हायकमांडच्या भेटीवेळी ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करतील.
दिल्लीला जाण्यापूर्वी येडियुराप्पा यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तथापि, हायकमांडने त्यांना अद्याप दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे बुधवारी येडियुराप्पा दिल्लीला जातील की नाही, याविषयी अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून तीन-चार मंत्र्यांना सोडचिठ्ठी देऊन सात ते आठ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी केली आहे. परंतु, हायकमांडच्या भेटीनंतरच मंत्रिमंडळ विस्तार की पुनर्रचना?, हे स्पष्ट होईल.
राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक आणि विधानपरिषद निवडणूक होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तारासाठी कोणत्याही हालचाली होत असल्याने मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला आहे.
भाजप वरिष्ठ नेते बिहार निवडणूक आणि तेथे सत्तास्थापनेच्या तयारीत व्यग्र असल्यामुळे येडियुराप्पा यांना दिवाळीपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करणे शक्य झाले नव्हते. आता नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे येडियुराप्पा दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत.









