43 मंत्र्यांचा शपथविधी, महाराष्ट्र-कर्नाटकातील प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेला आठवडाभर चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी करण्यात आला. या विस्तारात पदोन्नती मिळालेले आणि नवे असे मिळून 43 मंत्री आहेत. या साऱयांचा शपथविधी बुधवारी संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप तसेच रालोआचे अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार दुसऱयांना निवडून आल्यानंतरचा हा प्रथमच मंत्रिमंडळ विस्तार आहे. यात अन्य मागासवर्गीय, दलित, वनवासी आणि अल्पसंख्य समुदायाच्या नेत्यांना मोठय़ा प्रमाणात स्थान देण्यात आल्याने ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र आचरणात आणला गेला आहे. या विस्तारासह आता केंद्रीय मंत्रिमंडळाचे संख्याबळ 76 इतके झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 36 नवे चेहऱयांना स्थान मिळाले आहे.
बुधवारी शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. कर्नाटकातून राजीव चंद्रशेखर, भगवंत खुबा, ए. नारायणस्वामी आणि शोभा करंदलाजे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या विस्तारात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आसाम, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांना प्रामुख्याने प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्रत्येक राज्यातील विविध विभागांचाही विचार प्रतिनिधित्व देताना करण्यात आल्याचे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.
12 मंत्र्यांचे राजीनामे
मंत्रिमंडळ विस्तार करताना विद्यमान 12 मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री निशांक पोखरियाल, खत व रसायनमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय थावरचंद गेहलोत, संतोषकुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, देबश्री चौधरी यांनाही वगळण्यात आले आहे.
मित्र पक्षांनाही स्थान
भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असणारे संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती पक्ष, अपना दल इत्यादी मित्र पक्षांनाही स्थान देण्यात आले आहे. संयुक्त जनता दलाचे रामचंद्र प्रसाद सिंग, लोकजनशक्ती पक्षाचे पशुपती पारस, आणि अपना दल पक्षाच्या अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.
साधला ‘सर्वसिद्धीयोग’
बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ‘सर्वसिद्धी योगा’चा प्रारंभ झाला होता. त्यामुळे शपथविधीसाठी हाच कालावधी निर्धारित करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे हा योग साधक मानला जातो. कोणतेही शुभ कार्य या योगावर करण्याची प्रथा आहे. ती आचरण्यात आली आहे.
15 कॅबिनेट, 28 राज्यमंत्री
या विस्तारात एकंदर 15 कॅबिनेट मंत्र्यांना तर 28 राज्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये प्रामुख्याने अनुभवी, तर राज्यमंत्र्यांमध्ये तरूण आणि नव्या चेहऱयांना स्थान देण्यात आले आहे. या 43 मंत्र्यांपैकी 7 मंत्री पूर्वीही मंत्रिमंडळात होते. त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
प्रथमच सहकार विभाग
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच ‘सहकार खाते’ निर्माण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे सहकार हा विभाग राज्य सरकारांच्या कार्यकक्षेतील असल्याने राज्यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्र्यांचा समावेश असतो. तथापि. यावेळी केंद्र सरकारमध्येही सहकार विभाग स्थापन करण्यात येणार असून त्याचे उत्तरदायित्व कोणावर सोपविले जाणार याची उत्सुकता आहे.
जात, प्रदेश आणि विभाग
मंत्रिमंडळ विस्तार करताना जातीच्या समीकरणांवर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते. अन्य मागासवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना मोठय़ा प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. तसेच अल्पसंख्यांकाही स्थान देण्यात आले आहे. या विस्तारात 7 महिलांनाही स्थान देण्यात आले आहे.
2 माजी मुख्यमंत्र्यांना स्थान
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना वगळण्यात आले आहे. आसामच्या मुख्यमंत्रीपदी हिमंत बिस्व सर्मा आल्याने सोनोवाल यांना केंद्रात घेण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे 7 मंत्री
या विस्तारात सर्वाधिक स्थाने सर्वात मोठे राज्य असणाऱया उत्तर प्रदेशला देण्यात आली आहेत. या राज्याचे सात मंत्री या विस्तारात आहेत. येत्या मार्चमध्ये या राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेशला सर्वाधिक स्थाने देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
सात मंत्र्यांची ‘पदोन्नती’
मंत्रिमंडळात यापूर्वीच असणाऱया सात राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यात हरदीप पुरी, किरण रिजिजू, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर आणि राजकुमार सिंग यांचा समावेश असून त्यानी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीमुळे पदोन्सिंदिया आणि सोनोवाल
मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी जी दोन नावे सर्वाधिक चर्चेत होती, ती ज्योतिरादित्य सिंदिया आणि सर्बानंद सोनोवाल ही आहेत. सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री होते. त्यांना केंद्रात आणण्यात आले असून बव्हंशी ते राज्यसभेवर निवडून आणले जातील. ज्योतिरादित्य सिंदिया 2019 मध्ये काँगेस सोडून भाजपमध्ये आले होते. त्यांच्यासह काँग्रेसचे 18 आमदारही फुटले होते. परिणामी, मध्यप्रदेशचे काँगेस सरकार कोसळले होते. या दोन्ही नेत्यांना वजनदार विभाग दिले जातील, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
नवे कॅबिनेट आणि राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री
नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंदिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपतीकुमार पारस, किरण रिजिजू, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, भूपेंद्र यादव, जी किशन रेड्डी, अनुराग ठाकूर
राज्यमंत्री
पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्यपालसिंग बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानूप्रताप सिंग वर्मा, दर्शना जरदोश, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए. नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, देवूसिंग चौहान, भगवंत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत कराड, राजकुमार रंजन सिंग, भारती पवार, बिश्वेश्वर तुडू, शांतनू ठाकूर, जॉन बार्ला, डॉ. एल. मुरुगन, निशित प्रामाणिक









