राज्य भाजप नूतन प्रभारी अरुण सिंग यांची माहिती : बेंगळुरात पत्रकारांशी साधला संवाद
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करावा, याचा निर्णय मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पच घेणार आहेत, अशी माहिती नूतन राज्य भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी दिली. बेंगळूरमधील मल्लेश्वरम येथील पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. वरिष्ठांच्या परवानगीनंतर तात्काळ मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी तीन-चार वेळा सांगितले आहे. मात्र, आता राज्य भाजप प्रभारींनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अरुण सिंग पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे योग्यवेळी ते मंत्रिमंडळ विस्तार करतील. यामुळे प्रसारमाध्यमे याची इतकी का आतुरतेने वाट पाहत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काही आमदारांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, अरुण सिंग म्हणाले, मुख्यमंत्री येडियुराप्पा चांगले काम करत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेला काहींचा विरोध होऊ शकतो. त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यता नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील सिरा आणि राजराजेश्वरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आज-उद्या करत पुढे ढकलण्यात येत आहे. येडियुराप्पांनी काही आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्याठिकाणी नव्यांना संधी देत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासह पुनर्रचना करण्याचा विचार चालविला होता. यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. तीन दिवसांनंतर मत कळविले जाईल, असे वरिष्ठांनी सांगितले होते. मात्र, 15 ते 20 दिवस झाले तरी कोणतीच अनुमती दिलेली नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱयांनी मंत्रिमंडळाचा विस्तार की पुनर्रचना याचा निर्णय स्पष्ट करावा, असा दबाव ते मुख्यमंत्र्यांवर टाकत आहेत. विधान परिषद सदस्य आर. शंकर, एम. टी. बी नागराज, एच. विश्वनाथ, आमदार मुनिरत्न यांच्यासह अनेक आमदारांनी मंत्रिपदावर डोळा ठेवला आहे.