मुख्यमंत्र्यांना डावपेचांपुढे न झुकण्याचे निर्देश
बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आनंद सिंह यांना आपल्या आवडीचे मंत्रिपद न दिल्याने ते नाराज आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. पण भाजपचे केंद्रीय नेतृत्व मंत्रिमंडळात फेर बदल करण्यास तयार नाहीत. त्यामुळे मंत्री आनंद सिंह यांच्या मागण्या पूर्ण होणे अवघड आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना कळवले आहे की मंत्रिमंडळात तातडीने फेरबदल होणार नाही आणि मंत्र्यांना जी खाती दिली आहेत त्या विभागात त्यांनी काम करावे. मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच चार रिक्त असणारी मंत्रीपदे भरण्यासाठी दोन महिने लागतील, असेही सूत्रांनी सांगितले.
आनंद सिंह आणि नगरपालिका आणि लघु उद्योग मंत्री एम. टी. बी. नागराज जे काँग्रेस-जेडी (एस) युतीमधून बाहेर पडले, ते मंत्रीपदाच्या वाटपावर नाराज आहेत.
नागराज यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, परंतु गेल्या दोन आठवड्यांत बोम्माई यांच्याशी दोन बैठका होऊनही सिंह नाखुश राहिले आहेत. त्यांनी अद्याप त्यांच्या नवीन विभागाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला नाही, असे म्हटले आहे.
सिंह यांनी घेतलेल्या पवित्रामुळे त्यांना कोणतेही फायदे मिळणार नाहीत. हायकमांडने मुख्यमंत्र्यांना अशा डावपेचांपुढे न झुकण्याचे निर्देश दिले आहेत, ”असे मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले.









