बेळगावच्या ज्योतिषांच्या बदनामीचा प्रयत्न : सायबर क्राईमकडे तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
सोशल मीडियाचा वापर अनेक वेळा चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींसाठीही केला जातो. एखाद्याला बदनाम करायचे असेल तर या माध्यमाचा हमखास वापर केला जातो. बेळगाव येथील ज्योतिषी आनंद मत्तीकोप-कुलकर्णी यांनाही याचा फटका बसला आहे. त्यांच्या नावे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून त्यांना नाहक मनस्ताप देण्याचा प्रयत्न झाला आहे.
या प्रकाराविरुद्ध आनंद मत्तीकोप यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली असून सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. 21 जानेवारी 2021 रोजी यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून व्हॉट्सऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडिओशी आपला काही एक संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वेगवेगळय़ा व्हॉट्सऍप ग्रुपवर एक मिनीट 51 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओत मंत्राने अग्नी प्रदीप्त केला जात असल्याचे दाखविले आहे. अजूनही ही विद्या शाबूत आहे, याचे प्रत्यंतर पहा, असा मजकूर लिहून आनंद मत्तीकोप यांचा मोबाईल क्रमांक सोबत जोडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणांहून त्यांना फोन येत आहेत.
1 मिनीट 51 सेकंदांच्या व्हिडिओत अग्नीकुंडासमोर मंत्र गुणगुणणारा एक वृद्ध, काही भाविक व भगवेधारी दिसतात. मंत्रोच्चार तीव्र होताच अग्निकुंडात धुराचे लोट निर्माण होऊन अग्नी प्रदीप्त होताना दिसतो, असा तो व्हिडिओ आहे. त्यामुळे देशभरातील विविध भागातून फोनवर संपर्क साधून लोक या व्हिडिओबद्दल चौकशी करीत आहेत. मात्र, या व्हिडिओशी आपला काडीमात्र संबंध नाही. आपण यासंबंधी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केल्याचे आनंद मत्तीकोप यांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









