भक्तिमय वातावरणात मूर्तीची मिरवणूक
वार्ताहर/ किणये
मंडोळी येथील भरमदेव मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ाला शनिवार दि. 25 रोजी मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी भरमदेव मूर्तीची मिरवणूक मोठय़ा जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत कलश घेऊन महिला मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
गुलालाची उधळण तसेच टाळ मृदंगाचा गजर व पारंपरिक वाद्यांचा गरज झाला. मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त गावात सर्वत्र भगव्या पताका लावण्यात आलेल्या आहेत. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी गावातील मारुती गल्लीतील फुरुनाथ मठासमोरून या मिरवणुकीला सुरुवात झाली.
प्रारंभी ज्योतिर्लिंग मूर्तीचे पूजन सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोरक्षनाथ मूर्तीचे पूजन धाकलू दळवी, तुळस पूजन नारायण बस्तवाडकर, ट्रक्टरचे पूजन शंकर पाटील, मुखवटा पूजन हभप यल्लाप्पा शहापूरकर, कलश पूजन कल्लाप्पा शहापूरकर, मंगल कलश पूजन कृष्णा हुंदरे, मिरवणूक व दिंडीचे पूजन शांताराम गेनूचे यांच्या हस्ते करण्यात आले.
भरमदेव मंदिराचा लोकार्पण सोहळा असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत मूर्ती व मुखवटा मिरवणूक सुरू होती. प्रत्येक घरासमोर महिला आरती ओवाळून मिरवणुकीचे स्वागत करीत होत्या.
रविवार दि. 26 रोजी सकाळी 9 वाजता वसंत जोशी गुरुजी व हभप पांडुरंग उपलानी महाराज यांच्या उपस्थितीत भरमदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर होमहवन करण्यात येईल. होमहवनसाठी देवस्थान पंच कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत. टिळकवाडी येथील आर्ष विद्या केंद्राचे चित्प्रकाशानंद सरस्वती स्वामीजी यांच्या शुभहस्ते कळसारोहण कार्यक्रम होणार आहे.
दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री 8 वाजता हभप पांडुरंग उपलानी यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर जागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळय़ाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळय़ानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी सोहळय़ाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.