कसालचा मंडळ अधिकारी : साठ वर्षीय व्यक्तीने केली होती तक्रार
खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी लाच
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ तालुक्यातील कसालचा मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे याला कायदेशीर खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची सातबारावर नोंद मंजूर करण्याकरिता कसाल मंडळ अधिकारी कार्यालयात रोख चार हजार रु. ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
ओरोस येथील साठ वर्षीय व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (कुडाळ) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. हांगे याने तक्रारदाराकडे जानेवारी 2021 च्या अखेरपासून काम करून घेण्यासाठी पैशांची मागणी लावून धरली होती. याबाबत तक्रारदाराने अधिकाऱयांना माहिती दिल्यानंतर दोनवेळा खातरजमा करण्यात आली होती. अखेर मंगळवारी दुपारी मंडळ अधिकारी कार्यालयात ठरल्याप्रमाणे चार हजार रु. स्वीकारताना हांगे याला रंगेहाथ पकडण्यात आले. यापूर्वी हांगे याच्याविरोधात तक्रारी होत्या. तसेच कुडाळ प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयात कार्यरत असतानाही त्याच्याविरोधात तक्रारी होत्या. मात्र, अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती. अखेर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपतच्या पथकाने हांगे याच्या कणकवली येथील निवासस्थानाची झडती घेतली. मात्र, काही सापडले नाही. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक केणी, सहाय्यक पोलीस फौजदार फाले, हवालदार रेवंडकर, परब, पोलीस नाईक पोतनीस व पालकर यांनी सहभाग घेतला. on









