प्रतिनिधी/ मंडणगड
मंडणगड पोलीस स्थानक व बाणकोट सागरी पोलीस स्थानक यांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आलेले दोन हजार किलो मांस न्यायालयाच्या निर्देशानुसार नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे.
शुक्रवारी म्हाप्रळ चेक पोस्ट तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षक उत्तम पिठे, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या नेतृत्वाखाली पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी मुंबईतील पाच व पिंपळोली येथील एक अशा सहा जणांना ताब्यात घेतले. मांसाची वाहतूक करत असलेल्या दोन गाडय़ाही ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे प्रमाणित करण्यास पोलिसांना फॉरेन्सिक लॅबची मदत घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने कारवाईसही पोलिसांनी प्रारंभ केला आहे. लॅबच्या अहवालानंतरच पोलिसांनी ताब्यात घेतलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, याची खातरजमा होणार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी अकीब शेख (चेंबुर) शाहिद युसुफ कुरेशी(गोवंडी) मोहमंद आदम कुरेशी (कुर्ला) इरफान कुरेशी (गोवंडी) मुजाहीद अब्दुलरेहमान शेख (गोवंडी), अजमल अकलाख पेटकर (पिंपळोली) या सहाजणांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे, मंडणगडचे पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्यासह पोलीस कर्मचारी बांगर, जाधव, पवार, मोरे, गमरे, वळवी, कोलापटे, माने, जाधव, होमगार्ड लोंढे यांच्या पथकाने केली.








