मनपा सभागृह अस्तित्वात नसल्याने पेच
बेळगाव : यंदाही कोरोनाचे संक्रमण वाढल्याने आणि लोकसभा पोटनिवडणुकीमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुरीच्या कात्रीत सापडला आहे. मनपा प्रशासक जिल्हाधिकाऱयांनी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळविली आहे. पण सध्या सभागृह अस्तित्वात नसल्याने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मंजुरीकरिता अर्थसंकल्प नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे अर्थसंकल्पाची माहिती देण्यास मनपा कार्यालयात टाळाटाळ करण्यात येत आहे. शहरातील विकासकामे अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राबविण्यात येतात. त्यामुळे महापालिकेसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. पण याबाबत महापालिकेच्या लेखा विभागात 2021-22 च्या अर्थसंकल्पाबाबत चौकशी केली असता, अर्थसंकल्पाला प्रशासकांनी मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली. मागील वषी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी अर्थसंकल्प मंजुरीला विलंब झाला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, याबाबत महापालिकेच्या लेखाधिकाऱयांना विचारले असता माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. अर्थसंकल्पानुसार विविध योजना राबविण्यासाठी राखीव निधी मंजूर केला जातो. पण सभागृह अस्तित्वात नसल्याने अर्थसंकल्प मंजुरीकरिता नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. अर्थसंकल्पास नगरविकास खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर राखीव अनुदानामधून योजना राबविण्यासाठी निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहराच्या विकासाच्यादृष्टीने अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. सदर विकासकामे अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर मार्गी लागणार आहेत. यामुळे महापालिका प्रशासन अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.









