ओटवणे / प्रतिनिधी:
सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्षाचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंगेश तळवणेकर आणि देव्या सूर्याजी यांना त्यांचे सामाजिक कार्य आणि जेष्ठांच्या प्रति असलेली तळमळ विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाने स्पष्ट केले आहे. यानिमित्त मंगेश तळवणेकर आणि देव्या सूर्याजी यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.