प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला निर्जन स्थळी बॉम्ब केला निकामी, राज्यातील विमानतळांच्या सुरक्षेत वाढ
अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या बॉम्बमुळे (टाईम बॉम्ब) सोमवारी सकाळी मंगळूरच्या बाजपे विमानतळावर खळबळ उडाली. सदर बॉम्ब सायंकाळी निर्जन स्थळी सुरक्षितपणे नेऊन स्फोट घडवून निकामी करण्यात आला. त्यामुळे संभाव्य घातपात टळला. प्रजासत्ताक दिन जवळ आलेला असतानाच विमानतळावर बॉम्ब आढळून आल्याने मंगळूर शहरात भीतीचे वातावरण होते. दरम्यान खबरदारी म्हणून राज्यातील सर्व विमानतळांवर सतर्कतेची सूचना देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी ऑटोरिक्षातून आलेल्या अज्ञात व्यक्तीने बॉम्ब असणारी लॅपटॉपची बॅग विमानतळावरील तिकीट काऊंटरजवळ सोडून दिली. 10 च्या सुमारास सदर बॅग आढळून आल्यानंतर औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी याविषयी पोलीस कंट्रोल रुमला माहिती दिली. त्यानंतर विमानतळावरील प्रवासी व इतरांना तेथून दूर जाण्याची सूचना देण्यात आली. बॅगमध्ये जिवंत बॉम्ब असल्याचा संशय बळावल्याने बेंगळूरमधील बॉम्ब निकामी पथकाला संदेश देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ती बॅग कंट्रोल एक्पोसिव्ह डिफ्युस मशीनमधील वाहन घालून अतिमहनिय व्यक्तींची वाहने पार्किंगसाठी असलेल्या जागेत उभी केली.
तातडीने बेंगळूरहून आलेल्या बॉम्ब निकामी पथकाने तसेच मेटल डिटेक्टर तपासणी कर्मचारी, श्वानपथकांनी विमानतळ परिसरात आणखी बॉम्ब आहेत का? याची तपासणी केली. विमानतळाला जोडणारे संपर्क रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. बॅगेमध्ये स्फोटके आहेत की वस्तू यावरून दुपारपर्यंत बराच गोंधळ निर्माण झाला. बॉम्ब निकामी पथकाने तपासणी केल्यानंतर स्टीलच्या डब्यात दीड किलो वजनाचा टाईम बॉम्ब आढळून आला. त्यानंतर बॅग कंट्रोल एक्पोसिव्ह डिफ्युस मशीन असणारे वाहन विमानतळापासून 2 कि. मी. अंतरावरील केंजारू येथे निर्जन स्थळी नेण्यात आले. तेथे 12 फूट खड्डा खणून त्यात बॉम्ब असणारी बॅग ठेवण्यात आली. नंतर खड्डय़ाच्या बाजूने वाळूने भरलेल्या पोती रचण्यात आल्या. सायंकाळी 5.30 च्या सुमारास रिमोटींग व्यवस्थेद्वारे स्फोट घडवून बॉम्ब निकामी करण्यात आला.
संशयिताचे छायाचित्र जारी
विमानतळावर बॉम्ब ठेवलेल्या व्यक्तीचा फोटो आणि त्याला विमानतळापर्यंत आणून सोडलेल्या ऑटोरिक्षाचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. सोमवारी सकाळी 7 ते 8 दरम्यान सदर व्यक्ती हातात लॅपटॉप बॅग घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयात आढळून आले आहे. त्याने टोपी घातल्यामुळे चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. त्याचा लवकरच शोध घेण्यात येईल, अशी माहिती मंगळूर शहर पोलीस आयुक्त डॉ. हर्ष यांनी सांगितले.
सर्व विमानतळांवरील सुरक्षेत वाढ
मंगळूर विमानतळावर बॉम्ब असणारी बॅग आढळून आल्यानंतर सतर्कता म्हणून बेंगळूर, हुबळी, म्हैसूर, बेळगाव व राज्यातील इतर विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांसह राज्य पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे. विमानतळावर येणाऱया प्रवाशांची आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
तपासासाठी तीन पथके
विमानतळावर आढळून आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली आहेत. प्रकरणासंबंधी प्राथमिक माहिती मिळविण्यात आली आहे. सतर्कतेमुळे संभाव्य घातपात उधळून लावणे शक्य झाले आहे. विमानतळावरच त्याचा स्फोट झाला असता तर 500 मिटरपर्यंत त्याचे दुष्परिणाम झाले असते. मोठय़ा प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली असती, अशी माहिती मंगळूर पोलीस आयुक्त पी. एस. हर्ष यांनी दिली.
विमानात बॉम्बस्फोट घटविण्याची धमकी
मंगळूरहून हैदराबादला जाणाऱया इंडिगो विमानातही बॉम्ब असल्याची शंका निर्माण झाली. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली. तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आले. विमानासह 126 प्रवाशांचीही कसून तपासणी करण्यात आली. विमानात बॉम्ब आढळला का? याबाबतची स्पष्ट माहिती सायंकाळपर्यंत उपलब्ध झाली नाही.
प्रकरणाचा लवकरच छडा लावणार
मंगळूर विमानतळावर आढळून आल्याच्या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्यात येईल. जनतेत भीती निर्माण करण्याचे प्रयत्न पूर्वीपासून करण्यात येत आहेत. अशी प्रकरणे भेदण्यासाठी आपण सतर्कत बाळगली आहे.
– बसवराज बोम्माई, गृहमंत्री (कर्नाटक)