पहिली मानवरहित मंगळ मोहीम : होप लालग्रहाच्या कक्षेत दाखल
वृत्तसंस्था / दुबई
संयुक्त अरब अमिरातची पहिली मानवरहित मंगळ मोहीम ‘होप प्रोब’ मंगळवारी 7 महिन्यांनी 49.4 कोटी किलोमीटरचे अंतर कापून मंगळाच्या कक्षेत पोहोचली आहे. मोहीम यशस्वी होताच युएईने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. युएईने पहिल्याच प्रयत्नात स्वतःचे अंतराळयान मंगळाच्या कक्षेपर्यंत पोहोचविले, याचबरोबर यशस्वी मंगळमोहीम राबविणारा युएई पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
यापूर्वी अमेरिका, सोव्हिएत संघ, युरोप आणि भारतच मंगळाच्या कक्षेपर्यंत पोहोचू शकले आहेत. युएईच्या अंतराळ संस्थेनुसार होप यान 1.20 लाख किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने ग्रहाला प्रदक्षिणा घालत आहे.
होपचे लक्ष्य मंगळाचे पहिले ग्लोबल वेदर मॅप तयार करणे आहे. हे अंतराळयान मंगळाच्या वातावरणाचे अध्ययन करणार आहे. होपचा वेग वाढविल्यास ते ग्रहापासून दूर जाऊ शकते आणि वेग मंदावल्यास ते मंगळ ग्रहावर नष्ट होण्याची शक्यता असल्याचे युएईच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. युएईनंतर गुरुवारी चीनचे तियानमेन-1 आणि 18 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अंतराळयान मंगळावर पोहोचणार आहे.
भारताचे मंगळयान-2
पुढील 4 वर्षांमध्ये 5 देश मंगळ ग्रहाकरता मोहीम साकारणार आहेत. सर्वप्रथम युरोपीय महासंघ आणि रशिया मिळून 2022 मध्ये एक्सोमार्स नावाचे लँडर-रोव्हर पाठविणार आहेत. त्याचवषीं जपान एक ऑर्बिटर आणि लँडर रवाना करणार आहे. 2023 मध्ये अमेरिकेचे साइकी यान मंगळाजवळून जाणार आहे. 2024 मध्ये भारत मंगळयान-2 प्रक्षेपित करणार असून यात एक ऑर्बिटर आणि एक लँडरही असणार आहे.









