वार्ताहर / मंगळवेढा
वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी CAA व NRC च्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता. दरम्यान, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवहार शांततेत सुरू होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
वंचित बहुजन आघाडीने बंद ची घोषणा केली होती. मात्र व्यापार्यांनी आपली सर्व दुकाने उघडी ठेवून व्यवहार केले. काही मोजकी दुकाने यावेळी बंद मध्ये सहभागी झाली होती. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी चोख पोलिस बंदोबस्त सर्वत्र ठेवला होता. शहरामध्ये एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, 20 पोलिस कर्मचारी, 30 होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवेढा शहरातील दामाजी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, लाळे कलेक्शन, शनिवार पेठेतील शिवाजी तालीम, साठेनगर, एस. टी. बसस्थानक, बोराळे नाका, सोलापूर मार्गावरील टोळ नाका, आदि ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. तर बोराळे दूरक्षेत्र, हुलजंती दूरक्षेत्र, नंदेश्वर दूरक्षेत्र, लक्ष्मी दहिवडी बीट, मंगळवेढा ग्रामीण बीट आदि ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरामध्ये मोटरसायकलवरून पोलिसांचे फिरते गस्त पथक ठेवण्यात आले होते.