प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात ओढे बुजवण्याचा कार्यक्रम दरवर्षी सुरु असतो. प्रशासनातील टेबलवर काम करणारे चिरीमिरी घेवून बांधकाम परवाने करण्यास मंजूरी देतात अन् विकसक धुमधडाक्यात काम सुरु करतात. त्याचा फटका पावसाळय़ात बसतो. 501 मंगळवार पेठेत खासगी विकसकाकडून चक्क ओढा बुजवून प्लाटिंगचे काम सुरु आहे. 3 फुटांच्या पाईप टाकून ओढा बुजवण्यात आला आहे. याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देताच कामाची पाहणी करण्यासाठी अभियंता दिलीप चिद्रे यांना पाठवले. परंतु शहर विकास विभागातून कशी मंजूरी दिली, त्यावर पालिकेकडून काय कारवाई होणार याचीच चर्चा सुरु आहे.
सातारा शहरात नव्यानेच 501 मंगळवार पेठ भागात गेल्या काही दिवसांपासून वेगाने खासगी विकसकाचे कामकाज सुरु आहे. नैसर्गिक ओढय़ावर तीन फुटी पाईप टाकून त्यावर माती टाकून प्लॉटिंग करण्याचे काम सुरु आहे. हे काम करत असल्याची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मिळताच त्यांनी याची पाहणी करण्यासाठी अभियंता दिलीप चिद्रे यांना प्लॉटिंगच्या ठिकाणी पाठवले. त्यावेळी हे काम पालिकेचे नाही तर खासगी असल्याचे समजले. त्यावरुन ते परत आले. परंतु प्लॉटिंग करण्यासाठी ओढा बुजवून परवानगी कशी दिली. परवानगी देणाऱ्यावर नेमकी कोणती कारवाई होणार अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.









