बाजारात तेजीचा सिलसिला कायम : निफ्टी 12,631.10 वर स्थिरावला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी शेअर बाजारातील तेजीचा सिलसिला कायम असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्या दिवशी सोमवारी अमेरिकन निवडणुकीचा प्रभाव भारतीय भांडवली बाजारावर राहिला होता. दुसऱया दिवशी दिवाळीची लगबग, कोविड19 च्या लशीची यशस्वी चाचणी आणि बिहार निवडणुकीचा होणारा निकाल यांच्या प्रभावाचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्सवर झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
मागील काही दिवसांपासून सलगची ही सातव्या सत्रातील तेजी राहिली आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 680.22 अंकांनी वधारुन 43,277.65 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 170.05 अंकांसह 12,631.10 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये मंगळवारी इंडसइंंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि टीसीएसचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
बायोटेक आणि फायजर यांच्याकडून कोविड लशीची तिसऱया टप्प्यातील चाचणी यशस्वी मार्गावर असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपला उत्साह कायम ठेवला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियाई बाजार तेजीत
जागतिक पातळीवरील सकारात्मक घटनांसह देशातील बिहार निवडणुकीच्या निकालाचे पडसादही बाजारावर पडल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. याच्यासह आशियाई बाजारात हाँगकाँग, सियोल आणि टोकीयो आदी बाजार नफा कमाईत राहिले होते. शांघाय घसरणीत राहिला असून युरोपीयन बाजार लाभात होते. बाजारात विदेशी संस्थांकडून सोमवारी निव्वळ 4,548.39 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली आहे.








