अनेक ठिकाणी झाडे कोसळली : सुदैवाने कोणीही जखमी नाही, मात्र पावसामुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान

प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा सुरू होता. शनिवारी पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले होते. त्यानंतर पुन्हा मंगळवारी जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. शहराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱयाने आणि पावसाने काही ठिकाणी झाडे कोसळली तर थांबलेली वाहनेही वाऱयाच्या प्रवाहामुळे पुढे जाण्याच्या घटना घडल्या. तसेच दुचाकी काही ठिकाणी कलंडल्या होत्या. पावसाला जोर नसला तरी वाऱयामुळे साऱयांची तारांबळ उडाली होती.
मंगळवारी दुपारी 4 वाजता जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. दमदार पाऊस होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, पावसाने दिलासा दिला. पण वाऱयाने मात्र टिळकवाडी येथील लेले मैदानावरील झाड कोसळले. राणी चन्नम्मानगर रोडवरही एक झाड कोसळले. जोरदार वाऱयामुळे बराच वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. वाहनचालकांनी रस्त्यावरच वाहने लावून आडोसा शोधला.
पूर्व भागात दमदार पाऊस
जोरदार वाऱयासह वळिवाच्या पावसाचे आगमन झाले. शहराच्या पूर्व भागातील सांबरा, मुतगा, बसवन कुडची, हलगा, बस्तवाड या परिसरात दमदार पाऊस झाला. याचबरोबर दक्षिण भागातील येळ्ळूर, धामणे, देसूर, सुळगा या परिसरातही पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे साऱयांनाच आडोसा शोधावा लागला. गेल्या 15 दिवसांमध्ये उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली होती.
उन्हाचा तडाखा आणि उष्म्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. शनिवारी दमदार पडलेल्या पावसानंतरही उष्मा जाणवत होता. मंगळवारी रंगपंचमीदिवशी दुपारी 4 नंतर पावसाचे आगमन झाले.
जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाल्याने बैठे व्यापारी, फेरीवाले यांची तारांबळ उडाली. वाऱयापासून आणि पावसापासून बचाव करण्यासाठी साऱयांनाच धडपड करावी लागली. पावसाला जोर नसला तरी वाऱयामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुचाकीस्वारांनी रस्त्यावरच पार्किंग करून आडोसा शोधला. एकूणच वारा आणि पाऊस यामुळे बाजारपेठेत साऱयांची तारांबळ उडाली होती.
सांबरा एअरफोर्स येथे जीप गेली पुढे
सांबरा एअरफोर्ससमोर एक जीप पार्क करण्यात आली होती. पावसाचे आगमन झाले त्यावेळी अचानक जोरदार वाऱयाने जीप पुढे गेली. सुदैवाने ती एका खड्डय़ामध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबतचा काढलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पूर्वभागात दमदार पाऊस
मंगळवारी पूर्वभागात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक पिकांना फटका बसला आहे. काही पिकांना फायदा झाला आहे. याचबरोबर मशागतीसाठीही हा पाऊस काहीसा पोषक ठरला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.
दक्षिण भागात पहिल्यांदाच पाऊस
शहराच्या दक्षिण भागात वळिवाचा पाऊस पहिल्यांदाच झाला आहे. येळ्ळूर, वडगाव, सुळगा, धामणे, मजगाव परिसरात पावसाचा शिडकावा झाला आहे. पावसाला जोर नसला तरी पावसाचे आगमन झाले असून यामुळे कडधान्य पिकाला फटका बसला आहे. जोंधळा पीकही वाया जाण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.









