पुढील तीन वर्षांचा अजेंडा ठरणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची 3 दिवसीय परिषद चालू आठवडय़ात होणार आहे. या परिषदेत पुढील 3 वर्षांसाठी सरकारचा अजेंडा तयार केला जाणार आहे. मंत्र्यांच्या नव्या टीमची परिषद मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सुरू होणार असल्याचे समजते.
परिषदेत मागील एक महिन्यातील सर्व मंत्रालयांच्या कामकाजाची समीक्षा होणार आहे. तसेच मंत्रालयांसाठी नवी उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत. नव्या मंत्र्यांना त्यांचे विभाग तसेच मंत्रालयांविषयी विस्तृत माहिती देण्यात येणार आहे. केंद्राला कुठली अपेक्षा आहे हे मंत्र्यांना सांगण्यात येणार आहे.
रणनीति तयार होणार
मोदी सरकारवर अनेक मुद्दय़ांवरून सद्यकाळात टीका झाली आहे. कोरोना महामारी, नवे कृषी कायदे आणि रोजगारावरून सरकार लक्ष्य ठरले आहे. परिषदेदरम्यान या सर्व मुद्दय़ांवर चर्चा होईल. तसेच जनतेतील कथित वाढती नाराजी दूर करण्याचे मार्ग शोधले जाणार आहेत.
निवडणुकीवरही चर्चा
पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घसरण झाल्याचे बोलले जात असल्याने भाजपच्या चिंता वाढल्या आहेत. याचमुळे या परिषदेत आगामी निवडणुकीसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दोन आश्वासनांची पूर्तता
2019 मध्ये सत्ता राखल्यावर मोदी सरकारने दोन मोठी आश्वासने पूर्ण केली आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणणे आणि अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. या दोन्ही मुद्दय़ांवरून जनतेतील केंद्राची प्रतिमा मजबूत झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये लाभ होऊ शकतो.
मागील महिन्यात विस्तार
पंतप्रधान मोदींनी मागील महिन्यात 10 हून अधिक मंत्र्यांना हटविले होते. राज्यांमध्ये होणाऱया निवडणुका पाहता अनेक नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात 43 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यात 36 नव्या मंत्र्यांचा समावेश होता. नव्या मंत्र्यांमध्ये सर्वाधिक 7 जण उत्तरप्रदेशातील तर 3 गुजरातमधील आहेत. दोन्ही राज्यांमध्ये पुढील वर्षीच विधानसभा निवडणूक होणार आहे. तर विद्यमान मंत्र्यांपैकी 7 जणांना बढती देण्यात आली आहे.









