दोन महत्त्वपूर्ण निर्णयावर मेरिलबोन क्रिकेट क्लबचे शिक्कामोर्तब
लंडन / वृत्तसंस्था
क्रिकेट लॉचे कस्टोडियन मानल्या जाणाऱया मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) सध्याच्या नियमांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले असून यानुसार नॉन स्ट्रायकर एण्डवरील मंकडिंगला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तसेच, एखादा फलंदाज झेलबाद होत असताना दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केले असले तरी नवा फलंदाजच स्ट्राईकवर येणे बंधनकारक असणार आहे. षटक पूर्ण झाले असेल तर ही बाब यात अपवाद असेल. चेंडूला चकाकी आणण्यासाठी सलाईव्हाचा वापर करता येणार नाही, हे देखील एमसीसीने यावेळी निश्चित केले.
गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाज क्रीझ सोडून पुढे जात असल्यास गोलंदाजाने मंकडिंग पद्धतीने बाद करणे आजवर वादग्रस्त ठरत होते. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसह अन्य काही खेळाडूंनी ही फलंदाजाला बाद करण्याची रितसर पद्धत असल्याचा दावा सातत्याने केला होता. मात्र, आता या पद्धतीने बाद करण्याला रितसर मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी, 1948 मध्ये भारतीय लिजेंड विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज बिल ब्राऊनला अशा पद्धतीने सर्वप्रथम बाद केले होते. नंतर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी या पद्धतीला मंकडिंग असेच नाव दिले. पण, सुनील गावसकर यांच्यासारख्या काही दिग्गजांनी अशा पद्धतीने फलंदाजाला बाद करणे खिलाडूवृत्ती दर्शवत नाही, अशा शब्दात टीका केली होती.
सलाईव्हावर बंदी
यापूर्वी कोव्हिड-19 च्या कालावधीत आयसीसीने चेंडूला सॅलिव्हा लावण्यावर पूर्ण बंदी लादली होती. आता सलाईव्हा लावून चेंडूच्या मुव्हमेंटवर काहीच परिणाम होत नाही, असे सांगत त्यांनी यावरील बंदीवर शिक्कामोर्तब केले आहे.









