लंडन : प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे झालेल्या सामन्यात आघाडीच्या मँचेस्टर सिटी संघाने एव्हर्टनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर सिटीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपल्या नजीकच्या संघापेक्षा 10 गुण अधिक घेत आघाडीचे स्थान मिळविले आहे. अलिकडच्या कालावधीतील मँचेस्टर सिटीचा विविध स्पर्धांमधील हा सलग 17 वा विजय आहे.
32 व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीचे खाते फिल फॉडेनने उघडले. त्यानंतर काही मानिटातच लुकास डिग्नेने एव्हर्टनला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या उत्तरार्धात मँचेस्टर सिटीतर्फे दुसरा गोल बर्नार्डो सिल्वाने नोंदविला. रियाद मेरेझने मँचेस्टर सिटीचा तिसरा गोल नोंदवून एव्हर्टनचे आव्हान संपुष्टात आणले. मँचेस्टर सिटीने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 24 सामन्यांतून 56 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून मँचेस्टर युनायटेड आणि लिसेस्टर सिटी हे दोन्ही संघ प्रत्येकी समान 46 गुणांसह दुसऱया स्थानावर आहेत.









