प्रतिनिधी/ म्हापसा
भाजपच्याच विद्यमान आमदार तसेच विरोधी पक्ष नेते आज भाजपवर आरोप करीत आहेत. या एकंदर आरोपामुळे भाजपा सरकारची प्रतिमा मलीन झाली असून गोव्यात पुन्हा एकदा कधी निवडणुका होतात याची प्रतीक्षा सर्व सामान्य जनता करीत आहे. भाजपमध्ये आयात केलेली काँग्रेसमधील घाण आगामी गांधी जयंतीपूर्वी नाहिसी करण्यासाठी भाजपात स्वच्छता मोहिम राबविण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांनी आपल्या काणका येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजप सरकारात जे भ्रष्टाचारी मंत्री आमदार आहेत त्यांना या सरकारातून त्वरित काढून टाकावे अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती कांदोळकर यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी व्यासपीठावर हळदोणचे सरपंच सुभाष राऊत, उपसरपंच शुक्रादिनी पोळे, माजी सरपंच तथा पंच दिपक नाईक, प्रणेश नाईक, प्रियंका पिंटो, तसेच शिरसईचे माजी सरपंच आनंद टेमकर उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेजारच्या गोठय़ातील गुरे भाजपच्या गोठय़ात समावेश केल्याने अर्थात कांग्रेसमधील भेसळ भाजपमध्ये समावेश केल्याने भाजपचे नाव आणखीन बदनाम झाल्यचा दावा यावेळी कांदोळकर यांनी केला.
औद्योगिक विकास महामंडळात मोठा भ्रष्टाचार
हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक विकास महामंडळात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे अलिकडेच उघडकीस झाला असल्याचा दावा माजी आमदार कांदोळकर यांनी केला. डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जमीन रुपांतराच्या तब्बल दीड हजार फाईल्स मंजूर झाल्याचा दावाही यावेळी कांदोळकर यांनी केला.
औद्योगिक विकास महामंडळात कित्येक बाबतीत नियमबाह्य कामकाज घडत असल्याचा आरोपही सातत्याने होत असून त्याची चौकशी होणे गरजेच आहे अशी माहिती यावेळी कांदोळकर यांनी दिली. आपल्यास हे सरकार कामकाज करायला देत नाही अशी कैफियत मांडून टिकलो यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यावर आरोप केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
शिरसई पंचायतीचे माजी सरपंच तथा जिल्हा पंचायत सदस्य उमेदवार आनंद टेमकर यांनी सांगितले की, पंचायत पातळीवर भाजपचे कार्य योग्यरीत्या व्हावे असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे मात्र हे कार्य कधी होऊ शकते तर विकास कामे करण्यास पंचायतीला आर्थिक निधी मिळाला तर गेल्या तीन वर्षापासून शिरसई पंचायतीला अद्याप निधी मिळालाच नाही. याविरुद्ध माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या सहकार्याने सचिवालयात तसेच विधानसभेत आम्ही यावर आवाज उठविला मात्र त्याचे काहीच झाले नाही. आम्हाला आर्थिक निधी दरवर्षी साडेचार ते पाच लाख एवढाच येतो. आमची पंचायत गरीब आहे. आमच्या गावात फक्त पेट्रोलपंप आहे त्यापलिकडे काहीच नाही. आम्हाला पंचायतीला गरीब म्हणून ऑक्ट्रोय हा सरकारी निधी येतो मात्र गेल्या तीन वर्षापासून यातील एकही पैसा आम्हाला आलेला नाही. या दरम्यान आजपर्यंत चार पंचायत संचालक बदलले गेले. मात्र त्यांनी काहीच केले नाही. पंचायत मंत्री माविन गुदीन्हो यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत आम्हाला केंद्राकडून आर्थिक निधी येत नाही तोपर्यंत आम्ही पंचायतींना फंड देऊ शकत नाही. तीन वर्षाचा निधी मिळून आम्हाला साधारण पंचायतीला 45 लाख रुपये येणे बाकी आहे. मात्र तो अद्याप आलेला नाही. हा निधी त्यांनी सर्व पंचायतींना द्यावा अशी मागणी केली.
हळदोणासाठी पूर्णवेळ सचिव द्या
हळदोणा ही सर्वात मोठी 11 सदस्यीय पंचायत आहे. भौगोलिक दृष्टय़ाही ती मोठी आहे. या गावात आपल्या कामासाठी नागरिकांना लांबून यावे लागते मात्र पंचायतीत आल्यास तेथे सचिव अनुपस्थित असतात. हळदोणा पंचायतीला पूर्णवेळ सचिव द्यावा. मंत्री माविन गुदीन्हो यांनी लक्ष द्यावे अशी मागणी कांदोळकर यांनी केली. येथे पूर्णवेळ सचिव न ठेवण्यामागचे कटकारस्थान स्थानिक आमदार ग्लेन टिकलो व पंचायत मंत्री माविन गुदीन्हो यांचे आहे. यामागचे कारण म्हणजे ही पंचायत सध्या किरण कांदोळकर यांच्याकडे आहे. जरी ही पंचायत कांदोळकर यांच्याकडे असली तरी भाजपकडेच आहे. मी भाजपचाच सदस्य आहे असा ादवा कांदोळकर यांनी केला. आमदार याकडे लक्ष देऊ शकले नाही म्हणून ही परिस्थिती उपस्थित झाली अशी माहिती त्यांनी दिली. सचिवाला बाजूला ठेवून हा राग संपूर्ण गावावर काढण्यात येतो असा आरोप त्यांनी केला. हे आमदार टिकलो यांनी लक्षात ठेवावे. जे पंचायत संचालक वयोवृद्ध आहेत त्यांची बदली येथून त्वरित करावी व त्याजागी नवीन संचालकाची नेमणूक करावी अशी मागणीही त्यांनी केली.
शरिसई पंचायतीवर एवढा राग का? शिरसईच्या सरपंच आनंद टेमकर यांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी आपाय सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. आज दीड महिना उलटला तरी त्यांच्या जागी नवीन सरपंच निवड होत नाही. हळदोणच्या बाबतीतही असेच झाले होते तेथे आमदार टिकलो मध्यस्ती पडले होते. तर शिरसईमध्ये आमदार निळकंठ हळर्णकर मध्ये पडून या निवडणुका पुढे ढकलू पाहत आहे. कोलवाळच्या सरपंचपदाच्या निवडणुका लगेच घेण्यात आल्या. ती फाईल लगेच काढू शकता तर शिरसईच्या माझ्या पंचायतीवर राग का? असा प्रतिसवाल कांदोळकर यांनी करीत अशा संचालकाचा आपण निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. हा अन्याय तुम्ही त्या त्या भागातील नागरिकावर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.









