वायुतळापर्यंत सुरक्षित जाण्याचा मार्ग शोधला
वृत्तसंस्था / पठाणकोट
पठाणकोट येथील वायुतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक पोलीस अधिकाऱयांचाही हात होता. या भ्रष्ट अधिकाऱयांनी हल्ल्यापूर्वी वायुतळाची रेकी केली. यातील एका पोलीस अधिकाऱयाने निर्जन राहणाऱया मार्गाची ओळख पटविली होती. या मार्गाचा वापर दहशतवाद्यांनी दारूगोळा, ग्रेनेड, मोर्टार आणि एके-47 रायफल नेण्यासाठी केला होता असा दावा पत्रकार एड्रियन लेवी आणि कॅथी स्कॉट क्लार्क यांनी ‘स्पाय स्टोरिज ः इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ द रॉ अँड द आयएसआय’ या स्वतःच्या पुस्तकात केला आहे.
वायुतळावर हा हल्ला 2 जानेवारी 2016 रोजी झाला होता. भारतीय सैन्याच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. दशतवादी भारत-पाकिस्तान सीमेवर रावी नदीच्या मार्गाने आले होते. भारतीय भागात पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी काही वाहनांचे अपहरण करून पठाणकोट वायुतळात दाखल झाले होते. वायुतळाच्या कुंपणभिंतीवर चढून ते आत शिरले होते. या हल्ल्यात 7 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. हल्ला पूर्णपणे उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांना 3 दिवस लागले होते.
सुरक्षा वाढविण्यास अपयश
या सातत्याने इशारा मिळून देखील वायुतळाची सुरक्षा मजबूत करण्यात आली नव्हती असे संयुक्त चौकशीत आढळून आले होते. पंजाबमधील 91 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या सीमेवर कुंपण करण्यात आले नव्हते. नद्या आणि नाले घुसखोरीच्या दृष्टीकोनातून संवेदनशील ठरू शकतात असे किमान 4 अहवालांमध्ये म्हटले गेले होते. तरीही तारांचे कुंपण लावण्यात आले नव्हते. 6 वेळा लेखी सूचना करूनही गस्त वाढविण्यात आली नव्हती. टेहळणीसाठी सर्व्हिलान्स तंत्रज्ञान आणि मूव्हमेंट ट्रकर्स लावण्यात आले नव्हते.
दहशतवाद्यांना पोलिसांची साथ
पठाणकोट हल्ल्यासाठी भारतात 350 किलो वजनाची स्फोटके खरेदी करण्यात आली होती. याकरता जैश-ए-मोहम्मदने पैसे पुरविले होते. पुस्तकानुसार स्थानिक पोलीस अधिकाऱयांसह दहशतवाद्यांच्या भारतातील सहाय्यकर्त्यांनी वायुतळाची रेकी केल्याचा संशय होता. एका पोलीस अधिकाऱयाने सुरक्षेच्या उपाययोजना कमी असलेले ठिकाण शोधून काढले होते. फ्लडलाइड्स अत्यंत खाली होत्या आणि सीसीटीव्ही कॅमेऱयांमध्ये कुठलेच कव्हरेज नव्हते. दहशतवाद्यांना साथ देणारे पोलीस अधिकारी किंवा सहाय्यकर्त्यांनी भिंत ओलांडून दुसरीकडे दोरखंड फेकला होता. याच्या मदतीने दहशतवादी 50 किलो वजनाचा दारूगोळा, 30 ग्रेनेड, मोर्टार आणि एके-47 रायफल घेऊन शिरले होते असे आयबीच्या एका अधिकाऱयाने लेखकांना सांगितले होते.









