मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे प्रतिपादन : दाबोळीत माविन गुदिन्हो यांच्यासाठी केला प्रचार
प्रतिनिधी /वास्को
काँग्रेस, तृणमुल काँग्रेस व आम आदमी पार्टी यांना भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि धोकेबाजीसाठीच ओळखण्यात येत असून त्यांना गोव्यात स्थान देऊ नका. गोव्याला निसर्गाचे सौदर्य, संस्कार आणि संस्कृतीचे वरदान लाभलेले असून गोव्याने विकासाचा नवा इतिहास रचलेला आहे. गोव्याचे हित सांभाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन भाजपाचे नेते व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दाबोळी मतदारसंघात केले.
दाबोळी मतदारसंघातील नवेवाडे येथील संतोषी माता संस्थानच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री व दाबोळीचे उमेदवार माविन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, नगरसेवक विनोद किनळेकर, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, जयंत जाधव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवा सर्वांना सामावून घेतो
या सभेत बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी गोव्याच्या वैशिष्ठांचा उल्लेख करून गोव्याची स्तुती केली. ते म्हणाले, गोव्याला निसर्गाने सौदर्याचे वरदान दिलेले आहे. इथे संस्कार व संस्कृती वाहते आहे. इथे बंधुभाव आहे. गोवा अद्भभूत आहे. दुधात साखर मिसळावी तसा गोवा सर्वांना समावून घेत आहे.
वैशिष्टय़पूर्ण गोव्याला भाजपच हवा
मोठय़ा मनाचे लोक गोव्यात आहेत. अशा वैशिष्ठांनी भरलेल्या गोव्यात केवळ भाजपाचीच सत्ता योग्य आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल म्हणजे गोव्याच्या विकासाचा आड येणारा अपशकुन असून त्यांना थारा देऊ नका. त्यांच्यापासून सावध राहा असे आवाहन मुख्यमंत्री चौहान यांनी केले.
काँग्रेस हे बुडणारे जहाज
काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. त्यामुळे नेते त्यांना सोडून जात आहेत. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, तृणमूल म्हणजे गुंडागर्दी आणि आप म्हणजे धाकेबाजी आहे. आतापासूनच या पक्षांमध्ये आपसांत भांडणे होऊ लागलेली आहेत. भाजपा मात्र गोव्याच्या विकासाकडे लक्ष्य केंद्रीत करून आहे.
पर्रीकरांनी विकासाचा पाया घातला
पर्रीकरांनी गोव्याचा विकासाचा पाया घातला. ते जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत गोव्यासाठी जगले. गोल्डन गोवा हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्यामुळेच आजचा गोवा पाहायला मिळत आहे. आता गोवा म्हणजे देशात सगळय़ाचबाबतीत ‘वेल डन’ गोवा म्हणून ओळखला जात आहे असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले. विकासाची ही परंपरा मुख्यमंत्री प्रमोद सावंतही चालवत आहेत. येत्या सहा महिन्यात गोव्याचा खाण उद्योगही सुरू होईल असे सांगून त्यांनी गोव्याने केंद्र सरकारच्या मदतीने केलेल्या विकासाचा आढावा घेतला.
भारतीयांना मोदींनी सन्मान मिळवून दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाविषयी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला लाभलेले वरदान असल्याचे सांगितले. त्यांनी देशाचा स्वाभिमान जागवलेला आहे. आज भारतीय माणसाला जगात सन्मान प्राप्त झालेला आहे. मोदी जगाचे नेतृत्व करीत आहे. 130 कोटी भारतीयांना मोदींनी सन्मान मिळवून दिला आहे असे स्पष्ट करून मोदींनी देशात केलेल्या कार्याचीही त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 नंतरही पंतप्रधानपदी असतील. गोव्यातही त्यांच्या नेतृवाखालीच कार्यरत राहायला हवा. गोव्याला डब्बल इंजिन सरकारचीच गरज आहे. काँग्रेस विकास शक्य नाही असे सांगून त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर या सभेत टीका केली. मंत्री माविन गुदिन्हो यांचेही या सभेत भाषण झाले.









