तक्रारीसाठी देणार पर्सनल व्हॉट्सअॅप नंबर
ऑनलाईन टीम / तरुण भारत
आम आदमी पार्टीने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस या पंजाब राज्यात दावा करणाऱ्या पक्षांना झटका देत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. अर्थात पंजाबच्या नागरीकांना आता आम आदमी पार्टीकडून अधिक अपेक्षा असणार आहेत. या अपेक्षांना पुर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी वेगाने पावले उचलत असल्याचं स्पष्ट झालं असुन या पार्श्वभुमीवर पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात भ्रष्टाचार मोठी मोहिम सुरू केली असून त्यांनी राज्यातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी आज मोठा निर्णय घेतला आहे.
मान यांनी भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल, अशी घोषणा आज केली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून पंजाबमधील लोक व्हॉट्सअॅपवर भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी पाठवू शकतील असे सांगितले आहे. राज्यातील जनता आता भ्रष्टाचाराला कंटाळली असुन पंजाब सरकार कोणत्या ही परिस्थितीत भ्रष्टाचाराला थारा देणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
याबद्दलची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. हा हेल्पलाईन नंबर 23 मार्च रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे भगवंत मान यांनी सांगितले. ९९% लोक प्रामाणिक आहेत, १% लोक व्यवस्थेचा नाश करतात. मी नेहमीच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले. आता पंजाबमध्ये हफ्ते वसुली थांबणार आहे. हफ्ते वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास देणार नाही. असं ते यावेळी म्हणाले.








