बेंगळूर /प्रतिनिधी
कोरोना काळात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई), वेंटिलेटर, सॅनिटायझर्स आणि मुखवटे खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. हे आरोप जर खरे असतील आणि ते सिद्ध झाले तर मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देईन असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्रीरामुलु यांनी विरोधी पक्षनेत्याचा आरोप फेटाळून लावतांना म्हंटले आहे. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांच्या खरेदीत पारदर्शकता आहे. ही खरेदी सहकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्यास सुरवात झाली तेव्हा देशात वैयक्तिक संरक्षक उपकरणे, सॅनिटायझर्स आणि व्हेंटिलेटरचे जास्त उत्पादन झाले नाही, अचानक मागणी वाढल्यामुळे या उत्पादनांच्या किंमती जास्त झाल्या. परंतु आता मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे त्यांचे दर खाली आले आहेत. या प्रकरणात मार्चमध्ये खरेदी केलेल्या साहित्याच्या किंमतींची तुलना जून-जुलैच्या किंमतीशी करता येणार नाही. एप्रिल आणि जूनच्या किंमतींचा उल्लेख करून भ्रष्टाचाराचे आरोप करणे योग्य नाहीत असे मंत्री श्रीरामुलु यांनी म्हंटले आहे.
राज्य सरकारने अशी उपकरणे खरेदी करण्यासाठी आतापर्यंत ७९ कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु विरोधी पक्षनेते १५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत आहेत. ९ लाख ६५ हजार वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) खरेदी करण्यासाठी ७९ कोटी ३५ लाख १६ हजार ८१६ रुपये खर्च केले गेले आहेत. श्रीरामुलू यांनी हा आरोप सिद्ध करण्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना आव्हान दिले आहे.
उपमुख्यमंत्री डॉ.सी.एन. अश्वथनारायण म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्याने केवळ तामिळनाडूमध्ये ४ लाख ७९ हजार रुपयांमध्ये व्हेंटिलेटर खरेदीचा दाखला देऊन राज्य सरकारने १६ लाख ७० हजार रुपये इतक्या किमतीला व्हेंटिलेटर खरेदी केल्याचा आरोप केला आहे. बाजारात ४ ते ५० लाख रुपयांपर्यंतचे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा प्रकारे तुलना केली जाऊ शकत नाही. विरोधी पक्षनेते त्यांनी केले आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.









