प्रतिनिधी / खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर जावून आदळली. सुदैवाने जीवितहानी टळली असून बसचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.
मुंबईच्या दिशेने जाणारी श्री साई पूजा कंपनीची आरामबस भोस्ते घाटात आली असता दाट धुक्यामुळे चालकास रस्त्याचा अंदाज आला नाही. बस दुभाजकावर जावून आदळल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशी पुरते भयभीत झाले. मात्र, कोणालाच दुखापती झाल्या नसल्याचे निदर्शनास आल्यानंतरच साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
अपघाताची खबर मिळताच पोलीस यंत्रणेसह मदतग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, स्वप्निल पाडगे, राजन खेडेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातग्रस्त बस बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.









