खांडोळा सरकारी महाविद्यालयाची विद्यार्थीनी : भोम सातेरी मंदिराजवळील गतिरोधकावर अपघात
वार्ताहर / माशेल
फोंडा-पणजी महामार्गावर भोम येथील सातेरी मंदिराजवळ कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. स्नेहा महादेव प्रभू (21, रा. कलमामळ बोरी, मूळ मातोंड, वेगुर्ला) असे तिचे नाव आहे. दुचाकीचालक वंदित विजयशाम म्हार्दोळकर (20, म्हार्दोळ) हा किरकोळ जखमांवर बचावला आहे. अपघात काल बुधवारी दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर ट्रक एचआर 55 एए 4743 फेंडय़ाहून पणजीच्या दिशेने जात होता. भोम येथील अरूंद रस्त्यावरून वाहने पुढे सरकत असताना कंटेनर सातेरी मंदिराजवळील गतिरोधक पार करण्याच्या पवित्र्यात असताना फोंडय़ाहून जाणाऱया केटीएम डय़ूक जीए 05 एन 8616 दुचाकीने कंटेनरला पाठिमागे धडक दिली. या धडकीत दुचाकीचालक रस्त्याच्या मधोमध फेकला गेला तर त्याच्या पाठिमागे बसलेली युवती दुचाकीवरून खाली कोसळताना डोके कंटेनरच्या बाजूने होत कंटेनरच्या पाठिमागील चाकाखाली सापडले. त्यात ती जागीच ठार झाली.
खांडोळा सरकारी महाविद्यालयाची विद्यार्थींनी
स्नेहा प्रभू ही सरकारी महाविद्यालय खांडोळा येथील तृतीय वर्षाची विद्यार्थीनी आहे. विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्राच्या तृतीय वर्षात शिकत होती. वंदित म्हार्दोळकर फोंडा येथून स्नेहाला आपल्या केटीएम डय़ूक दुचाकीने खांडोळा कॉलेजात सोडण्यासाठी निघाला असता हा अपघात घडला. यावेळी वंदित यांने हेल्मेट परिधान केले नसल्याचे आढळले आहे.
घटनेप्रकरणी महाविद्यालयानेही दु:ख व्यक्त केले आहे. कॉलेजमधील हुशार विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करणारी सूचना जारी केली असून कुटूंबियांचे सांत्वन प्राचार्य पुर्णकला सामंत यांनी केले आहे. स्नेहा यांचे मूळ कुटुंबीय वेगुर्ला महाराष्ट्र येथील असून मागील काही वर्षापासून कलमामळ बोरी येथे स्थायिक झालेली आहे. तिचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी असून चार भावंडापैकी सर्वात धाकटी स्नेहा होती.
याप्रकरणी हवालदार रोहिदास भोमकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तापसणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी कंटेनरचालक महमूबसाब कासिमसाब गुनारी (39, हुबळी) व दुचाकीचालक यांना फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहे.
अरूंद रस्ता, महामार्गाचा प्रश्न मार्गी लावावा-सरपंच भोमकर
फोंडा-पणजी महामार्गावरील भोम सातेरी मंदिर ते काळीमातीपर्यंत रस्ता अरूंद असून याठिकाणी अनेक अपघाताच्या नोंदी आहेत. बसस्थानकावर प्रवाशांना घेण्यासाठी प्रवाशी बसेस थांबा घेतात तसेच अरूंद रस्त्यामुळे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असते. त्यामुळे महामार्गाचा विस्तार प्राधान्यक्रमाने करावा अशी मागणी भोम पंचायतीचे सरपंच सुनिल भोमकर यांनी केली आहे.









