ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. श्यामला हिल्स परिसरात उभारण्यात आलेल्या एमपी टुरिझमच्या ड्राईव्ह इन सिनेमा येथे हे लसीकरण केंद्र सुरू असून, शनिवारी येथे 95 जणांचे लसीकरण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या या लसीकरण केंद्रावर जाऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पूर्व नोंदणी असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना या ठिकाणी रोज सायंकाळी 5 ते 8 दरम्यान लस देण्यात येणार आहे. आणखी काही ठिकाणी ही अशी लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत.
एमपी टुरिझ्मचे व्यवस्थापकीय संचालक एस. विश्वनाथन म्हणाले, या लसीकरण केंद्रांसाठी पिकअप आणि ड्रॉपची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. किलोमीटरप्रमाणे नाममात्र शुल्क आकारुन ही सेवा देण्यात येईल.









