मध्य प्रदेश सरकारचा चौकशी आदेश, सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील कमला नेहरु रुग्णालयात बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत चार बालकांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाला गेली 15 वर्षे नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते, असे समजते. तरीही ते सुरु होते. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश मध्यप्रदेश सरकारने दिला असून राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. प्रत्येक मृत बालकांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी ही आग लागली. त्यावेळी या अतिदक्षता विभागात 40 बालके होती. त्यांच्यापैकी 36 बालकांचे जीव वाचविण्यात यश आले. मात्र चार बालके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. हा अतिदक्षता विभाग रुग्णालयाच्या तिसऱया मजल्यावर आहे. आग लागल्यानंतर त्वरित अग्निशामक दलाच्या गाडय़ा पोहचल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली.
पालकांचा संताप
आग लागल्यानंतर बालकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी रुग्णालयाचा कर्मचारीवर्ग तेथून पळून गेला असा आरोप काही संतप्त पालकांनी केला. अनेक पालक आपली अपत्ये घेऊन तेथून त्वरेने बाहेर पडल्याने त्यांच्या अपत्यांचे जीव वाचले. अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर मोठय़ा प्रमाणात धूर पसरल्याने काही दिसेनासे झाले होते. त्यामुळे गोंधळ उडाला असेही काही प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. मात्र आग लवकर आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.
गेल्या आठवडय़ात महाराष्ट्रात अहमदनगर येथे एका रुग्णालयाच्या कोरोना विभागाला लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेत 17 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत.









