भोगावती / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शाहूनगर, परिते ता. करवीर येथे भोगावती परिसर स्वाभिमानीच्या वतीने शुक्रवारी दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील व जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात जनता दल जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शेकापचे राधानगरी तालुका चिटणीस अंबाजी पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष रंगराव पाटील, करवीर तालुकाध्यक्ष विलास पाटील, इरिगेशन फेडरेशनचे सखाराम चव्हाण, महिला आघाडीच्या शारदा कोईगडे, रावसो डोंगळे आदी प्रमुखासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ११ वा चालू झालेल्या चक्का जाम आंदोलनामुळे राधानगरी, शेळेवाडी व कोल्हापूर मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. दोन तासानंतर दुपारी १ वाजता आंदोलनाचा समारोप करण्यात आला.









