प्रतिनिधी / परुळे:
देशातील सुंदर समुद्र किनारा म्हणून ओळख मिळविल्यानंतर भोगवे गावाला पर्यटकांची पहिली पसंती राहिली आहे. यात मोठे कलाकार, चित्रकार व खेळाडू यांनी यापूर्वी या गावाला भेट देऊन वास्तव्य केले करीत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आहे. या यादीत आता प्रसिद्ध हिंदी अभिनेता आमिर खान याचा समावेश झाला आहे.
भोगवे येथे पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर आमिर खान माघारी फिरला आहे. नवीन चित्रपट निर्मितीसाठी सिंधुदुर्गात लोकेशन्स पाहण्यासाठी तो आला असल्याचे बोलले जात होते. मात्र, भोगवे येथील कॉको शंभाला हॉटेलमध्येच राहून नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणे त्याने पसंत केले. या भेटीदरम्यान कोणत्याही लोकेशनची त्याने पाहणी केली नाही. तीस डिसेंबरपासून चार जानेवारीपर्यंत तो येथील हॉटेलमध्ये थांबला होता.
कर्मचाऱयांबरोबर केले फोटोसेशन
आमिर खानने जाताना हॉटेलमधील कर्मचाऱयांशी मोकळेपणाने संवाद साधला व त्यांच्याबरोबर फोटोसेशन करीत त्यांना खूश केले. आमिरने चार दिवसांच्या या मुक्कामात भारतीय पद्धतीच्या जेवणावरच भर दिला. यात प्रामुख्याने चिकन, मासे यांना पसंती दर्शविली.
मोबाईल नेटवर्क नसल्याने गैरसोय
भोगवे गावात इतरही नामांकित हॉटेल्स सुरू झाली आहेत. मात्र, तेथे प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे पर्यटकांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.