प्रतिनिधी /बेळगाव
नगरविकासमंत्री भैरती बसवराज यांनी राजीनामा द्यावा, या मुद्दय़ासाठी सोमवारी सभाध्यक्षांच्या आसनासमोर काँग्रेसने धरणे धरले. याच मुद्दय़ावर दुपारी सभात्यागही करण्यात आला. अप्रिय घटनांसंबंधी महत्त्वाची चर्चा करायची असल्याने तूर्त माघार घेतली तरी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सभागृहात सांगितले.
सोमवारी माजी मंत्री आर. एल. जालाप्पा यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू केला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी त्याला विरोध केला. भैरती बसवराज यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आम्ही धरणे धरले आहे. धरणे सुरू असताना प्रश्नोत्तर कसे घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी प्रश्नोत्तराचा तास रोखता येत नाही, याकडे सभाध्यक्षांचे लक्ष वेधले.
भैरती बसवराज यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गेले चार दिवस कर्नाटकात सुरू असलेल्या अप्रिय घटनांसंबंधी चर्चा करण्यास संधी द्यावी, अशी मागणी करत निजद आमदारांनी गदारोळ माजविला. म. ए. समितीविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना झाली आहे, या मुद्दय़ावर आम्हाला चर्चा करायची आहे, असे सांगत निजदचे शिवलिंगेगौडा, डॉ. अन्नदानी, सा. रा. महेश यांनी आरडाओरड सुरू केली.
काँग्रेसचे धरणे, निजदची आरडाओरड यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याच परिस्थितीत सभाध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. गदारोळात तीन-चार प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. गदारोळ सुरू असतानाच दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास प्रश्नोत्तराचा तास संपविण्यात आला. त्यावेळी संपूर्ण राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल चर्चा करायची आहे. त्यामुळे तुम्ही धरणे मागे घ्या, असे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी विरोधी पक्ष नेत्यांना सांगितले. याचवेळी विरोधी पक्ष इतर आमदारांच्या हक्कावर गदा आणत आहेत. त्यामुळे ते बेजबाबदार आहेत, असा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला. त्यामुळे गदारोळ वाढताच सभाध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.
भोजन विरामानंतर दुपारी 3.15 वाजता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
थेट प्रक्षेपण बंद…
भैरती बसवराज यांच्या राजीनाम्याच्या मुद्दय़ावर एकीकडे सभाध्यक्षांच्या आसनासमोर काँग्रेसचे धरणे सुरू असताना विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद झाले. हा प्रकार लक्षात येताच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ही गोष्ट सभाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले असणार, आपण ते सुरू करण्याची सूचना देऊ, असे सभाध्यक्षांनी सांगितले.









