अध्याय तेरावा
भगवंत म्हणाले, साधकाने निरिच्छ व्हावे म्हणजे त्याला आहे त्यात समाधान मिळेल व तो विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेत राहील. मी कर्ता आहे या भावनेने किंचितसा जरी अहंकार उत्पन्न झाला तरी तो मायाग्रस्त होतो. अहंकार माणसाच्या आनंदाला संपवून टाकतो. आनंदाचा विकास थांबला की, जीवाची विषयासक्ती वाढते आणि जीव वासनेच्या आधीन होतो. असा मनुष्य त्याच्या आत्मस्वरूपाला विसरल्याने आपण स्वतः परिपूर्ण आहोत हे विसरतो आणि देह तोच मी असा दृढ देहाभिमान त्याला होतो. कर्माकर्मांचे आघात तो झेलत बसतो. त्याला अनेक प्रकारच्या यातना होतात आणि जन्ममरणादिकांच्या भोवऱयात सांपडून महादुःखाने तो व्याकुळ होतो. म्हणून देहाभिमान सोडण्यासाठी स्वतःच्या मनाने जे जे म्हणून साधन तो करतो, त्याचाही त्याला अभिमान वाटू लागतो. देहाभिमान सोडावयाला गेले तरी सुटत नाही. म्हणून साधकांना कठोर साधनेचे श्रम सोसावे लागतात. साधना म्हणजे वेदोक्त स्वधर्माचरण करावे, पूर्ण वैराग्य साधावे, थोडक्मयात जे जसं वाटय़ाला येईल तसं आनंदानं स्वीकारावं आणि अत्यंत प्रेमाने माझे भजन करावे. देहाभिमान तत्काळ जाण्यासाठी माझे अखंड नामस्मरण करीत रहावे. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समान मत्स्वरूप भावना ठेवावी. म्हणजे माझ्यामध्ये चित्त प्रवेश करते. माझ्यामध्ये चित्त ठेवले की, तो मत्स्वरूपच होतो आणि संसारासंबंधी चिंता नाहीशी होते. द्वैताची भेदभावना तुटली नसताना जो स्वतःला ज्ञानी समजतो, तो अज्ञानीच होय. कारण अज्ञानी मनुष्याला सर्व माणसे वेगवेगळी दिसत असतात आणि त्याच्या मनात भेदाभेद निर्माण होतो.
जो मनुष्य अनेकत्वाचा भ्रम युक्तीयुक्तीने नाहीसा करीत नाही, तो जागा असूनही झोपलेलाच समजावा. अनेक वर्ण, अनेक व्यक्मती, निरनिराळी गोत्रे, निरनिराळय़ा जाती, अधम व उत्तम असे विधींचे प्रकार, यांमुळे चित्तामध्ये दृढ भेद उत्पन्न होतो. काळा मी, गोरा मी, काळासावळा मी, उत्तम ज्ञानाने श्रे÷ तो मी, उत्तम पवित्र कृति माझीच, माझे कुल श्रे÷ व मी उत्तम कुलवान असा भेदाभेद मनात उत्पन्न झाला असता, अद्वैत सांगणारी श्रुती पाहून किंवा शास्त्रार्थाच्या युक्ति ऐकूनही ज्या साधकांच्या मनातील भेदाची निवृत्ती होणार नाही त्याचा ज्ञानाभिमान व्यर्थ होय, त्याचे कर्माचरण व्यर्थ होय. तो अज्ञानरूपी लांबलचक स्वप्न पहात बसतो. झोपेत बरळलेल्या शब्दांनी काही अर्थ निघत नाही, त्याप्रमाणे केवळ पठण केले असता परमार्थ प्राप्त होत नाही. इतकेच नव्हे, तर श्रुतिशास्त्रांचा खरा शास्त्रार्थही त्यांना समजत नाही. नित्य वेदाध्ययन करतात पण कामक्रोधांची जर निवृत्ती होत नसेल, तर त्या पठणाने परमार्थाची प्राप्ती कधीच व्हावयाची नाही. देहाभिमान धरून आणि भेददृष्टि ठेवून कोटय़वधी वेदशास्त्रे पठण केली तरी परमार्थाची भेट व्हावयाची नाही.
देहाभिमानासह सर्व भेदभावना जोपर्यंत पूर्णपणे गेली नाही, तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त व्हावयाचे नाही. कारण भेद हाच मोठे बंधन होय. यावर सनकदिकांनी शंका विचारली की, मनातून भेद गेल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही असे तुम्ही म्हणता पण भेद हा वेदानेच प्रतिपादन केलेला आहे मग वेदाचे म्हणणे खोटे कसे म्हणता येईल ?
सनकादिकांची शंका लक्षात घेऊन सर्व लोकाना नीट कळेल अशा रीतीने वेदाचा विभाग देव समजाऊन सांगू लागले. ते म्हणाले, अशी शंका घ्याल तर त्याविषयी मीच तुम्हाला वेदवचनातील निरनिराळय़ा भागांचा विचार नीट सांगतो.
समाजाचे संचालन सुव्यवस्थित चालावे म्हणून मी वेदवचन सांगितले आहे. ज्याच्या मनात अज्ञानरुपी भेद ठाण मांडून बसलेला आहे त्याच्यासाठी हा वेदाचा नियम लागू होतो परंतु ज्या भक्ताला माझ्या स्वरूपात पूर्ण ऐक्मय लाभलेले असते, त्याच्या लक्षात आलेले असते की, माझ्याशिवाय अन्य काही नाहीच कारण सर्वव्यापी काय तो मीच आहे तेथे भेदाला मुळीच थारा नाही म्हणून त्याच्यापाशी वेदवचने लाचार होतात.
क्रमशः







