‘भेटीलागी जीवा लागलीसे आस…..’ अशी पांडुरंगाचे मुखदर्शन होण्याची आस लागलेल्या तुकारामांनी आर्त विनवणी करून रात्रंदिवस तुझ्या दर्शनाची वाट पाहत असल्याचे सांगत पांडुरंगाचा धावा केला होता. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱयातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने भूवैकुंठी येणाऱया सर्वसामान्य वारकऱयालाही हीच आस लागून राहिली आहे. कोरोनाचे संकट कधी दूर होते आणि पांडुरंगाचे दार कधी खुले होते असे त्याच्या भाविकांना झाले आहे. वारीच्या निमित्ताने येणाऱया मानाच्या दहाही पालख्या संतांच्या पादुकांसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहनातून पंढरपुरी पोहोचल्या. अत्यंत साधेपणाने चंद्रभागेच्या नितळ पाण्यात ज्या भाग्यवान सेवकांनी या पादुकांना स्नान घातले असेल त्यांनाही चंद्रभागेचे ते रूप भुलवून गेले असेल. प्रत्येक वषीच्या आषाढी वारीत भाव भक्तीची चर्चा कमी आणि वारकऱयांच्या आरोग्य, स्वच्छता या बाबीतील चर्चाच जास्त होत होती. चंद्रभागेचे शुद्धीकरण, शौचालयांची उभारणी, नगरपालिका आणि विविध प्राधिकरणास लागणारा निधी, त्याची मागणी, त्याचे प्रस्ताव, त्यावरून आश्वासने आणि न्यायालयीन लढे या बाबी ऐकण्याची जणू लोकांना सवय लागली होती. कोरोनाच्या संकट काळाने भाविकांना पंढरीपासून दूर ठेवले हे वाईट झाले. मात्र त्याच निमित्ताने चंद्रभागेचे स्वच्छ रूपही पाहता आले. वारी समभावाचे प्रतीक आहे, वारी सर्वांना सामावून घेते, प्रत्येकाला एक वेगळी अनुभूती देते, जगण्याचे ध्येय ठरवते असे वारीचे गौरवगान गात आजपर्यंत वारी होत आली. या वारीच्या निमित्ताने एक प्रबोधनाचे पर्वही महाराष्ट्र अनुभवत आला आहे. संतांनी दिलेल्या शिकवणीची उजळणीही होत राहिली आहे. मात्र तरीही वारीच्या निमित्ताने व्यक्त होणारे पंढरीचे दुःख काही शमलेले नाही. प्रत्येक वारीच्या काळात ते वेगळय़ा पद्धतीने मांडले जाते. वाढती लोकसंख्या आणि तितकाच वाढता लोकसहभाग यामुळे यंत्रणा तोकडी पडत जाते. पुनः पुन्हा नवीन आव्हाने उभी राहतात. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या निमित्ताने वारी होऊ शकली नाही. या निमित्ताने मंदिर परिसरातील डागडुजी, मूर्तीचा वज्रलेप आणि काही आवश्यक बाबींची कामे करून घेण्यात प्रशासनाला यश आले. मंदिराच्या दुरुस्तीचा एक आराखडाही तयार करण्यात आला, हे उत्तमच आहे. मात्र त्यादृष्टीने गतीने काम हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. वारकऱयांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि नजीकच्या काळात कोरोनाचे संकट हटले आणि प्रभावीपणे प्रत्येकाचे लसीकरण झाले तर कार्तिकीला किमान दोन्ही लशी घेतलेल्यांचे दर्शन पार पडण्यात सरकारला काही अडचण येण्याचे कारण नाही. जी भावना सर्वसामान्य जनतेची आहे तीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बोलून दाखवली आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर विठ्ठलाला साकडे घालताना कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि पुढच्या वेळी पंढरी भगव्या पताकांनी दुमदुमलेली पहायला मिळुदे असे साकडे त्यांनी घातले आहे. अर्थात पंढरी दुमदुमायची असेल तर राज्यकर्त्यांना लसीकरणाची जबाबदारी गतीने पार पाडावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ साकडे घालून उपयोगाचे नाही तर कृतिशील आणि आक्रमकही होण्याची नितांत आवश्यकता आहे. भाविकांना विठुरायाच्या भेटीची आस लागलेली आहे. त्यांना त्याचे दर्शन घडवणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. आजपर्यंत वारकऱयांनी सरकारला साथ दिलेली आहे. आता सरकारने भाविकांना साथ देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात येत्या चार महिन्यांमध्ये लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाले तर कार्तिक महिन्यातील एकादशीला भाविकांना पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणे अशक्मय नाही. सुरक्षितपणे आणि पूर्ण काळजी घेऊन आधुनिक पद्धतीने नोंदणीची व्यवस्था करून जर विठ्ठलाच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली तर प्रत्येक वारकरी त्याचे स्वागतच करतील. पण कोविशील्डचे 84 दिवस लक्षात घेता अगदी आजपासूनच वारकऱयांच्या लसीकरणाची तयारी करावी लागेल. नोव्हेंबर महिन्याला अजून वेळ आहे असे म्हणून गप्प बसता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने पुरी येथील जगन्नाथ मंदिरात रथोत्सवासाठी परवानगी देताना जवळपास 2800 भाविक आणि सेवेकऱयांना उपस्थित राहू दिले. अर्थात राज्यातील इतर रथोत्सवाना सबुरीचा सल्लाही दिला! महाराष्ट्रातही चारशे लोकांना एकावेळी परवानगी देण्यात आली. मात्र प्रत्येक वषी लाखो भाविक आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात, निरपेक्ष भावाने त्याची भेट घेतात आणि ज्यांना दर्शन मिळेल असे वाटत नाही ते कळसाला नमस्कार करून परत जातात. लाखो लोक प्रत्येक वषी दर्शनासाठी येतातच हे सत्य लक्षात घेऊन सरकारने नियोजन करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला साकडे घातले असले तरी यात्रेसाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण करणे त्यांच्या हाती आहे. शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने पालख्या पंढरपूरपर्यंत आणण्यासाठी राबल्या त्याच पद्धतीने येथे चार महिने राज्यातली यंत्रणा वापरली गेली, राज्यकर्त्यांनी आपली राजकीय इच्छाशक्ती आणि बळ दाखवून दिले तर वारीची वाट बिकट ठरणार नाही. कदाचित पारंपरिक पद्धतीने या वाऱयांचा मुक्काम होऊ देणे पुढच्या चार महिन्यातही अशक्मय ठरेल. मात्र एसटीमधून किंवा खाजगी वाहनातून लोकांना दर्शनासाठी मोकळीक देणे, त्यांची ऑनलाइन नोंदणी करून दर्शनाची वेळ ठरवून देणे आणि पुरेसे अंतर राखून त्यांना दर्शन घडवणे शक्मय होऊ शकते. अचानक सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल असे नसले तरीही दोन्ही लसी घेतलेल्या भाविकांना दर्शनासाठी सरकार वाट मोकळी करून देऊ शकेल. त्या दृष्टीने शासन आणि प्रशासनानेही इच्छाशक्ती दाखवण्याची नितांत आवश्यकता आहे. आजपर्यंत पुरेसे लसीकरण झालेले नाही त्यामुळे पंढरपुरात संचारबंदी लागू करून तीन हजार पोलिसांच्या बळावर सरकारने दोन आषाढी पार पाडलेल्या आहेत. मात्र यापुढे भाविकांचा अधिक अंत पाहण्यात अर्थ नाही. पांडुरंगाची दारे सर्वांसाठी आता खुली झाली पाहिजेत. लस उपलब्ध करणे आणि त्यासाठी शक्ती खर्च करणे हे काम मुख्यमंत्र्यांनी केले तर आजची पूजा सार्थकी लागली असे म्हणता येईल.
Previous Articleटी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी
Next Article मिताली राज मानांकनात पुन्हा अग्रस्थानी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








