वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय भूसेनेच्या दुकानांमधून आता महागडय़ा वस्तूंची ऑनलाईन विक्री होणार आहे. या विक्रीच्या पोर्टलचा प्रारंभ संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी शुक्रवारी केला. या दुकानांमधून वॉशिंग मशिन्स, मायक्रोव्हेव ओव्हन्स, रेफ्रीजरेटर्स, एअरकंडिशनर्स, टेलिव्हिजन सेट्स् आणि लॅपटॉप्स यांची विक्री ऑनलाईन केली जाणार आहे. पोर्टलचा उपयोग करून या वस्तूंची मागणी केली जाऊ शकते.
देशातील 45 लाख निवृत्त तसेच विद्यमान सैनिकांच्या कुटुंबांना या पोर्टलचा लाभ होऊ शकतो. या पोर्टल सेवेमुळे घरबसल्या या वस्तू ऑर्डर करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. याचा लाभ निवृत्त सैनिकांच्या कुटुंबांना होईल, असे या पोर्टलचा प्रारंभ करताना राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. या दुकानांमधून एअर प्युरीफायर्स, डिश वॉशर्स, मोबाईल हँडसेट्स्, होम थिएटर्स इत्यादी वस्तूही घरातूनच मागवता येतील. सध्याचे केंद्र सरकार सैनिकांच्या हितांना सर्वाधिक प्राधान्य देत आहे. सैनिकांच्या कुटुंबांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याची सरकारची योजना आहे. या योजनेचा एक भाग म्हणून या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले.









