ऑनलाईन टीम / भोपाळ :
5 ऑगस्ट रोजी म्हणजेच बुधवारी उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. यानंतर मंदीराच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. त्यातच आता भूमिपूजनाच्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहे. या फोटोमध्ये ते भगव्या पोशाखात दिसत आहेत. त्यांनी मंगळवारी हा फोटो बदलला असून ‘श्रीराम के हनुमान करो कल्याण’ असे लिहिले आहे.

याआधी त्यांनी सोमवारी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले होते की, प्रिय, देश बांधवांनो, मी आपल्या सर्वांच्या प्रगती आणि तुमच्या आनंदी जीवनासाठी उद्या सकाळी 11 वाजता हनुमान चालीसा पठण करणार आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी देखील आपल्या घरी किंवा मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करावी.
दरम्यान, याआधी देखील त्यांनी मी अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराचे स्वागत करतो. या मंदिराची निर्मिती सर्व भारत वासियांच्या सहामितीने होत आहे आणि असे केवळ भारतातच होवू शकते, असे ट्विट केले होते.









